आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Candidate Babanrao Pachpute, Green India,latest News In Divya Marathi

पाचपुते-जगताप समर्थकांत राडेबाजी, श्रीगोंदे मतदारसंघात यंदाही सुरू मारामारीचे राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर / श्रीगोंदे- श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात मारामारीच्या राजकारणाची परंपरा यावर्षीही कायम आहे. पैसेवाटपाचा आरोप करत भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांचे वडील कुंडलिकराव जगताप यांना कोंडीत पकडले. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. नंतर जगताप यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर देत राडा केला. जिल्हा बँकेच्या विकास अधिकारी कार्यालयात तब्बल पाच-सहा तास हा राडा सुरू होता.
जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील मतदारसंघ म्हणून श्रीगोंदे ओळखला जातो. मागील निवडणुकीत बाळासाहेब नाहाटा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेकीचे नाट्य घडले होते. पाचपुते व नाहाटा यांच्या कार्यकर्त्यांत राडेबाजी झाली होती. ही घटना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात घडली. यावेळी राडेबाजीला थोडी लवकर सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल यांचे वडील कुंडलिकराव जगताप हे सोमवारी (६ ऑक्टोबर) रात्री श्रीगोंदे येथील जिल्हा बँकेच्या विकास अधिकारी कार्यालयात निवडक कार्यकर्त्यांसह बसले होते. जगताप हे बँकेत बसून पैशांचे वाटप करत असल्याची व हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार पाचपुते यांनी निवडणूक अिधकाऱ्यांकडे केली. तहसीलदार डॉ. विनोद भांबरे, पोलिस निरीक्षक सचिन सानप तातडीने घटनास्थळी गेले. तत्पूर्वी पाचपुते समर्थकांनी जगताप यांना कार्यालयात कोंडून ठेवले होते.
ही माहिती पसरताच पाचपुते व जगताप समर्थकांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली. दोन्ही गटांचे जमाव आमने-सामने आले. जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. बँकेच्या आतील कक्षात बबनराव पाचपुते, कुंडलिकराव जगताप, तुकाराम दरेकर यांच्यात खडाजंगी झाली. कार्यकर्ते व नेते यांच्यात शिवराळ भाषेत परस्परांना शिवीगाळही झाली. पाचपुते, जगताप यांच्यासह २१ जणांवर श्रीगोंदे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली. तहसीलदारांनी पहाटे बँकेचे कार्यालय सील केले. तथापि, पाचपुते यांच्या मागणीवरून घेण्यात आलेल्या झडतीत रोकड सापडली नाही. दोन जगताप समर्थक पळून जाण्यात गेले. मतदारांना वाटण्यासाठीची रोकड त्यांनी नेल्याचा आरोप पाचपुते समर्थकांनी केला.

रात्री बँकेत जगताप काय करत होते ?
कुंडलिकराव जगताप रात्री जिल्हा बँकेच्या कार्यालयात बसून काय करत होते याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वीपासून जगताप समर्थकांनी आचारसंहिता पायदळी तुडवली आहे. मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी पैशांचा वापर केला जात आहे. जिल्हा बँकेच्या संचालकांनी बँकेला सुटी असताना रात्री तेथे थांबण्याचे कारण काय? या विषयाचे गांभीर्य जगताप यांना माहीत नव्हते का‌? जिल्हा बँकेच्या आवारातून पैशांचे वाटप होत असल्याचा आमच्या कार्यकर्त्यांना संशय होता. त्यासाठी आम्ही पोलिस व निवडणूक यंत्रणेला कळवले. परंतु जगताप यांनी समर्थकांची गर्दी गोळा करत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जगताप यांच्या कार्यकर्त्यांनीच हुल्लडबाजीचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कारवाई व्हावी.'' बबनराव पाचपुते, उमेदवार, भारतीय जनता पक्ष.
नैसर्गिक विधीसाठी गेस्ट हाऊसमध्ये गेलो
तीन मणके निकामी झाल्याने मला नैसर्गिक विधीसाठी कमोडचा वापर करावा लागतो. सोमवारी सायंकाळी अतिसाराचा त्रास होऊ लागल्याने मी जिल्हा बँकेच्या पाठीमागील इमारतीत असलेल्या कक्षात गेलो. स्वच्छतागृहाचा वापर केला. जिल्हा बँकेचा दहा वर्षे संचालक असल्याने बँक परिसरात जाणे-येणे आक्षेपार्ह कसे‌ ‌? पाचपुते यांनी पैसेवाटपाचे खोटे आरोप करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीत जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याने चिडून जाऊन सहानुभूतीसाठी त्यांनी बँक परिसरात गोंधळ करून आम्हाला आत बंद करून ठेवले. त्यांनीच आचारसंहितेचा भंग केला आहे. पाचपुतेंच्या निकटवर्ती तरुणांनी मला उद्देशून शिव्या दिल्या. आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांनी हेच संस्कार केले आहेत का? '' कुंडलिकराव जगताप, संचालक, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.