आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेनंतरची पहिलीच बैठक गाजली वादाने, भाजपच्या दोन गटांत शाब्दिक बाचाबाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत शहर संघटनेच्या आगामी कामकाजाबाबत चर्चा होणे अपेक्षित असताना जुन्या नाराजीतून खासदार दिलीप गांधी व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातही बाचाबाची झाल्यामुळे शहराध्यक्षांना ही बैठक लगेच आटोपती घ्यावी लागली.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शहर भाजपच्या वतीने गांधी मैदानातील पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, युवा मोर्चा, महिला आघाडी प्रमुख, सर्व आघाड्यांचे प्रमुख, नगरसेवक व कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक बोलवण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सुरू केलेले सदस्य नोंदणी अभियान, प्रभागनिहाय मंडल गठित करणे, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या नियुक्त्या या विषयांवर चर्चा होणार होती. या बैठकीसाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष अनिल गट्टाणी, मधुसूद मुळे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, नोंदणीप्रमुख अनंत जोशी, सहनोंदणी प्रमुख दामू बठेजा, माजी सरचिटणीस सुनील रामदासी, संपत नलावडे, बंटी डापसे, महेंद्र गंधे, श्रीपाद छिंदम, मालन ढोणे, महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा विद्ये, नलिनी नलवडे, मनेष साठे, महेश तवले, मनीषा बारस्कर, गीता गिल्डा उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करणाऱ्यांना बैठकीला का बोलावले? अशी विचारणा करून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर लगेचच खासदार गांधी व शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांच्या समर्थकांमध्येही जोरदार खडाजंगी उडाली. पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली बाचाबाची खाली रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना ऐकू येत होती.

वाद थांबण्याऐवजी नंतर वाढतच गेल्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांनी लगेचच बैठक आटोपती घेतली.बैठक आटोपल्यानंतर सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी यांच्यासह काही पदाधिकारी खाली निघून आले. मात्र, आगरकर व अन्य पदाधिकारी यांच्यात चर्चा सुरूच होती.