आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप जिल्हाध्यक्ष निवडीचा मुहूर्त हुकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी आता फार दिवस वाट पहावी लागणार नाही. जूनच्या आत भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर करू, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गेल्या आठवड्यात दिले होते. मात्र, जून उलटूनही जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर झाल्याने दानवे यांचे आश्वासन हवेतच विरले आहे.
लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवरून नाराज झालेले तत्कालीन जिल्हाध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेली लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक महापालिका स्थानिक निवडणुकाही भाजपने जिल्हाध्यक्षां विनाच लढवल्या होत्या. एक खासदार पाच आमदार असलेल्या भाजपला जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून जिल्हाध्यक्ष देता आलेले नाही. कुठल्याही एका नावावर एकमत होत नसल्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची निवड रखडली होती. राज्यात भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी महिन्याभरात जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केली जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले होते.
त्यानंतरही दोन वेळा त्यांनी हेच सांगितले. केंद्रातील भाजप सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त शहरात आयोजित जन कल्याण पर्व आनंदोत्सव कार्यक्रमात पालकमंत्री शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडे लवकरात लवकर जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय घ्या, अशी सूचना केली होती. त्यानंतर दानवे यांनी आपल्या भाषणात जिल्हाध्यक्षांसाठी तुम्हाला आता फार काळ वाट पहावी लागणार नाही. तारखेच्या आत जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर करून हा विषय संपवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, पाच जून उलटूनही प्रदेशाध्यक्ष अथवा प्रदेशपातळीवरून जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर झाले नाही.त्यामुळे दानवे यांचे जिल्हाध्यक्ष देण्याचे आश्वासन हवतेच विरले आहे. मात्र, जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमधील अनेकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्षपद नगर शहरातून द्यायचे की ग्रामीण भागातून द्यायचे यावरून सध्या प्रदेशपातळीवर खलबते सुरू आहे. जिल्हाध्यक्ष हा ग्रामीण भागातील असावा, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, ग्रामीण भागातून प्रभावी नाव पुढे येत नसल्यामुळे शहरातून हे पद दिले जाण्याची शक्यता आहे.
या पदासाठी पूर्वीपासून माजी आमदार चंद्रशेखर कदम, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा आहे. कदम हे पक्षाच्या स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित नसतात, ते केवळ नेते आल्यानंतर नगरला येतात, त्यामुळे त्यांच्या नावाला एका गटाचा विरोध असल्याचे बोलले जाते. आगरकर हे शहरातील असल्यामुळे तसेच त्यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्षपद असल्याने त्यांना ही जबाबदारी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
आता मुहूर्त जून महिना अखेरचा
पाच जूनपूर्वी जिल्हाध्यक्ष देण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्षांनी दिले होते. मात्र, तारीख उलटूनदेखील जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे आता जून महिन्याच्या अखेरीस जिल्हाध्यक्षांच्या निवडीला मुहर्त मिळणार असल्याचे समजते.
बातम्या आणखी आहेत...