आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपतील वादावर स्थानिकांचा ‘तोडगा’; अभिनंदनाचा ठराव मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका निवडणुकीसाठी योग्य उमेदवार दिल्याचे सांगत भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी शनिवारी रात्री पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत पंच कमिटीच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. कार्यकर्ते व उमेदवारांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूरही करण्यात आला. पंच कमिटीने पैसे घेऊन उमेदवारी दिल्याच्या वादावर स्थानिक पदाधिकार्‍यांनी चांगला ‘तोडगा’ शोधल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
जागावाटप, उमेदवारी व एबी फॉर्म देण्यावरून भाजपची पंच कमिटी अडचणीत आली. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर एबी फॉर्म देण्यावरून मोठा गोंधळ झाला होता. नाराज झालेल्या काहींनी पंच कमिटीवर पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचे आरोप केले होते. हा वाद प्रदेशपातळीवर गेला असला, स्थानिक पातळीवर मात्र या वादावर पडदा पडला आहे. शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत आरोपांबाबत चर्चा झाली. पंच कमिटीने निवडलेले उमेदवार योग्य असून नाराजांकडून होत असलेले आरोप निर्थक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कमिटीने 31 पैकी 9 जागांवर विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. उर्वरित जागांवरील काही उमेदवार युतीशी संबंधित, तर काही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
त्यानंतर भाजप कार्यकारिणीचे शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी पंच कमिटीने दिलेले उमेदवार योग्य असून त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे सांगत पंच कमिटीच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. उपस्थित कार्यकर्ते व उमेदवारांनी ठराव मंजूर केल्याने पैसे घेऊन उमेदवारी दिल्याच्या वादावर स्थानिक पातळीवर पडदा पडला.