आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Make Request To The Nagar Municipal Corporation Commissioner

भाजपचे नगर महापालिका आयुक्तांना साकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने व्यथित होऊन बेमुदत रजेवर गेलेले शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांना तातडीने कामावर रुजू होण्यास राजी करण्याकरिता भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांना बुधवारी साकडे घातले.

महापालिका प्रशासनाने 20 कोटींची 27 कामे प्रस्तावित केली आहेत. सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात ही कामे असल्याचा आरोप करत विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात मंगळवारी गोंधळ घातला. राष्ट्रवादीचे नगरसेवक समद खान यांनी अभियंता कुलकर्णी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे व्यथित झालेले कुलकर्णी बेमुदत रजेवर गेले आहेत.

भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारी आयुक्तांची भेट घेऊन विरोधी नगरसेवकांच्या कृतीचा निषेध केला. कुलकर्णी यांनी अनेक अनिष्ट प्रथा बंद करून कामांना चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उपमहापौर गीतांजली काळे, सभापती बाबासाहेब वाकळे, शिवाजी लोंढे, सुमन गंधे, नितीन शेलार, सचिन पारखी, संगीता खरमाळे, मालण ढोणे आदी उपस्थित होते.


तोडग्यासाठीची संयुक्त बैठक निष्फळ
20 कोटींची 27 कामे महापालिकेच्या 10 जून रोजी होणार्‍या सर्वसाधरण सभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत. सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाच्या सहकार्याने ही कामे पळवल्याची भावना विरोधी नगरसेवकांमध्ये असून त्यातूनच आरोपाचे प्रकरण घडले. हा तिढा सोडवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांची संयुक्त बैठक बुधवारी झाली. बाबासाहेब वाकळे, दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर संग्राम जगताप, आरिफ शेख, संजय गाडे यावेळी उपस्थित होते. 70 टक्के कामे सत्ताधारी, तर उर्वरित कामे विरोधकांच्या प्रभागात देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, एकमताअभावी ही बैठकही निष्फळ ठरली. विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा संग्राम जगताप यांनी दिला आहे.