आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरेसा वेळ देणार्‍यांवरच यापुढे पक्षाची जबाबदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जो पक्षाला पुरेसा वेळ देईल त्याच्यावरच यापुढे जबाबदारी देण्यात येईल.ज्याच्यांकडे पक्षासाठी वेळ नाही, त्यांना जबाबदारी दिली जाणार नाही, असे भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

शहर भाजप कार्यालयात आयोजित शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगरकर बोलत होते. उपमहापौर गीतांजली काळे, ज्येष्ठ नेते एल.जी. गायकवाड, नगरसेवक शिवाजी लोंढे, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, माजी सरचिटणीस सुनील रामदासी, संजय चोपडा, आनंद लहामगे, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, अन्वर खान, विनोद भिंगारे, धनंजय जामगावकर, विठ्ठल कानवडे, महिला आघाडीच्या प्रदेशच्या चिटणीस सुरेखा विद्ये, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मालन ढोणे, महिला आघाडीच्या प्रिया जानवे आदी यावेळी उपस्थित होते.

आगरकर म्हणाले, पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असणे यात काही गैर नाही. पक्ष वाढला पाहिजे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांची प्रतिष्ठादेखील वाढली पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बूथरचना हा महत्त्वाचा विषय आहे. बूथरचनेत कार्यकर्त्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे. जो पक्षासाठी आपला वेळ देईल, त्यालाच यापुढे जबाबदारी देण्यात येईल. जो वेळ देणार नाही त्याला कुठलीही जबाबदारी देण्यात येणार नाही. निवडणुकीत कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्यावर आपला भर आहे. मित्रपक्ष रिपाइंलाहीदेखील निवडणुकीत संधी देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात सात झोन करण्यात आले आहेत. या झोनची जबाबदारी संबंधित पदाधिकार्‍यांवर निश्चित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या पाचजणांची कमिटी उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेणार आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस 4 ऑक्टोबरला नगरला येणार आहेत. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, असे आगरकर यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले, महापालिका निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत.

हायटेक प्रचाराचे नियोजन
हायटेक प्रचार कसा करावा, याबाबत पुण्यातील एका खासगी कंपनीच्या सेल्समनने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदश्रन केले. त्याचे बोलणे सुरू असताना उपस्थितांमधून त्याच्या व्हिजिटींग कार्डची मागणी होऊ लागली. संबंधित सेल्समनने 50-60 जणांना कार्ड दिले.

शिवसेनेकडून निमंत्रण
जागावाटपाबाबत प्रदेश पातळीवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे.स्वबळाची भाषा आम्ही करणार नाही. युती करण्याबाबत शिवसेनेकडून निमंत्रण आले आहे. सेनेच्या पाचजणांच्या टीमने आपल्याशी याबाबत चर्चा केली आहे, असे आगरकर यांनी सांगितले.