आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर सदस्य करा अन् निवडणूक लढवा, सदस्य नोंदणीला कमी प्रतिसाद असल्याने आता नवा फंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाने देशपातळीबरोबरच राज्य, जिल्हा, तालुका व गावपातळीवर हाती घेतलेल्या सदस्य नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळत नाही. तीन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचे १०० सक्रिय सदस्य केल्याशिवाय कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठलीही निवडणूक लढवता येणार नाही, असा इशारा देत १०० सदस्य करा अन् निवडणूक लढवा, असे सूचित केले.
पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेचे उद्घाटन केले. साथ देऊ देश घडवू, सशक्त भारत, सशक्त भाजप हे या सदस्य नोंदणी अभियानाचे ब्रीदवाक्य आहे. चीनमध्ये साम्यवादी पक्षाची ७ कोटी ६ लाख सदस्य नोंदणी झाली आहे. त्याच धर्तीवर भारतात भाजपने १० कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते गाठण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सदस्य नोंदणी करण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देत आहेत. मात्र, तरीही नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत नाही.
सदस्य नोंदणीसाठीच्या प्रसिध्दीवर कोट्यवधीचा खर्च झाला असतानाही नोंदणीला अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीत रस्त्यावर उतरून भाजपची सदस्य नोंदणी केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष शहा यांनीही आपल्या भागात सदस्य नोंदणी केली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमध्ये भाजपची सर्वाधिक सदस्य नोंदणी झाली आहे. मात्र, उर्वरित िजल्ह्यांमध्ये या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळत आहे.
भाजपची सदस्य नोंदणी ऑनलाइन आहे. केवळ मिस कॉल देऊन भाजपचे सभासद होता येते. असे असूनही नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने तीन दिवसांपूर्वीच्या मुंबईत घेतलेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष शहा यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व नोंदणीप्रमुखांना सदस्य नोंदणीसाठी वेळ काढण्याच्या सूचना दिल्या. शंभर सक्रिय सदस्यांची नोंदणी झाल्याशिवाय कुणालाही पक्षाकडून निवडणूक लढवता येणार नाही, अशी तंबी देत शंभर सदस्य करा अन् निवडणूक लढवा, असे त्यांनी सांगितल्याचे समजते. सदस्य नोंदणी अभियानासाठी शहर व जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शहरात एक लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट
शहर भाजपला एक लाख, तर जिल्ह्याला ८ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. शहरात सदस्य नोंदणी व जनजागृतीकरिता कार्यशाळा घेण्यात येईल. सदस्य नोंदणीसाठी सावेडी, भिंगार, केडगाव, मध्यनगर, दक्षिण नगर व उत्तर नगर असे विभाग असून प्रत्येक विभागात अध्यक्ष, युवा मोर्चा व महिला पदाधिकारी व अन्य दोन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. दामोधर बठेजा, उपाध्यक्ष, शहर भाजप.

लपवाछपवी होणार उघड
पूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाची सदस्य नोंदणी कागदोपत्री होत असे. पक्षाकडून संबंधित पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीसाठी कोरे फॉर्म दिले जायचे. पदाधिकारी कोणत्याही बोगस नावाने फार्म भरून द्यायचे. भारतीय जनता पक्षाने मात्र प्रथमच सदस्य नोंदणी ऑनलाइन केली आहे. त्यासाठी १८००२६६२०२० हा मोबाइल क्रमांक देण्यात आला आहे. यावर मिस काल दिल्यानंतर पक्षाकडून एसएमएस येतो. त्यावर एक क्रमांक येऊन त्या क्रमांकावर नाव, पत्ता, वोटर क्रमांक व मेल-आयडी पाठवायचा. त्यानंतर नावाची नोंद केली जाते. ही आनलाइन नोंदणी कुठल्या राज्यातून, जिल्ह्यातून झाली ते स्ट्राँग रुमला समजते. त्यामुळे यात कुठलीही लपवाछपवी करता येत नाही.