आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेच का तुमचे "अच्छे दिन' ? मंत्री जावडेकर निरुत्तर, सदस्य नोंदणी आढावा बैठकीत तक्रारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "अच्छे दिन'च्या आश्वासनावर लोकांनी भाजपला मते दिली, मात्र शेतमालाला व दुधाला भाव नाही, हेच का तुमचे "अच्छे दिन' असा रोखठोक सवाल भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर निरुत्तर झाले. "थोडं थांबा' म्हणत त्यांनी सबुरीचा सल्ला दिला.
जिल्हा ग्रामीण भाजपची सदस्य नोंदणी आढावा बैठक जावडेकर यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात झाली. जिल्हा सदस्य नोंदणीचे प्रमुख भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले व मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, सदा देवगावकर, सुवर्णा पाचपुते या वेळी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जावडेकर यांनी सर्व तालुक्यांतील सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. नंतर काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारी मांडण्यास सुरुवात केली. त्यावर जावडेकर यांनी त्यांना "तुमच्या तक्रारी नको, सदस्य नोंदणीत आलेले अनुभव सांगा. तक्रारी ऐकण्यासाठी नंतर वेळ देतो' असे सांगितले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीत आलेले अनुभव सांगितले. एका पदाधिकारी म्हणाला, निवडणुकीत मोदींनी अच्छे िदन आणू, असे आश्वासन िदले होते. त्यावर लोकांनी िवश्वास ठेवून आमच्या सांगण्यावरून भाजपला मते दिली. मात्र, आज शेतमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही. हेच का तुमचे अच्छे िदन? त्यावर काय उत्तर द्यावे असा प्रश्न जावडेकरांना पडला. त्यांनी मोघम "थोडे थांबा' असे म्हणत त्या पदाधिकाऱ्याला सबुरी राखण्याचा सल्ला दिला.

कृपया पत्रकारांनी बैठकीतून बाहेर जावे...
बैठक सुरू होण्यापूर्वी सदस्य नोंदणीप्रमुख प्रा. भानुदास बेरड यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी बाबतची ही बैठक आहे. मंत्री प्रकाश जावडेकर येथे पत्रकारांशी संवाद साधणार नाहीत. साडेपाच वाजता एकविरा चौकात ते पत्रकारांशी बोलतील. कृपया पत्रकारांनी बाहेर जावे, असे सांगितले. त्याचवेळी जावडेकर यांनी कुणीतरी माझी पत्रकार परिषद होणार असल्याची अफवा पसरवली आहे. तरीदेखील मी ही बैठक झाल्यानंतर आपल्याशी बोलतो असे सांगितले. त्यानंतर पत्रकार बैठकीच्या ठिकाणावरून बाहेर पडले.