आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरे-जावयाच्या जामिनासाठी औरंगाबाद-दिल्लीकडे नजरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भूखंड खरेदी व्यवहारात नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले व प्रकाश कर्डिले यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या जामीन अर्जावर बुधवारी (18 जानेवारी) न्यायमूर्ती रवींद्र बोरडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
डॉ. कांकरिया यांची 92 लाखांना फसवणूक करून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्डिलेंना पोलिस कोठडी मिळाली होती. नंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यांच्या वकिलांनी खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.
आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई व अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी संदीप, सचिन, अमोल कोतकर व वाहनचालक अजय गायकवाड यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खूनप्रकरणी संदीप कोतकरसह चौघांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यानंतर जामिनासाठी त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वाेच्च न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्यात दोनवेळा हजेरीच्या अटीवर या चौघांना 17 जानेवारीपर्यंत तात्पुरता जामीन दिला होता. या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी बुधवारी सर्वाेच्च न्यायालयात होणार आहे. तेथे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.