आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीला आठवडाभरात मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीला आठवडाभरात मुहूर्त लागणार आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असली, तरी जिल्हाध्यक्षपदावर ऐनवेळी खासदार दिलीप गांधी यांच्या गटानेही दावा केल्याने जिल्हाध्यक्षपदाची चुरस आणखी वाढली आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अ‍ॅड. प्रताप ढाकणे हे राष्ट्रवादीत दाखल झाले. साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही भाजपला जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नाव मिळत नाही. जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये असलेले विद्यमान व सध्या राष्ट्रवादीत असलेली अनेक नावे चर्चेत आहेत. अ‍ॅड. ढाकणे यांना शह देण्यासाठी पाथर्डीतून जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्याची तयारी भाजपची आहे.
जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, अ‍ॅड. अभय आगरकर यांची नावे चर्चेत आहेत. गांधी गटानेही जिल्हाध्यक्षपदावर दावा केला आहे. गांधी गटाकडून आसाराम ढूस, अशोक गर्जे, नितीन कापसे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रम तांबे हे इच्छुक असली, तरी कदम यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लागण्याची शक्यता आहे. त्याअगोदर जिल्हाध्यक्षपदाची निवड व्हावी, यासाठी पदाधिका-यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला आहे.

मुंबई बैठकीत चर्चा नाही
गुरुवारी (3 जुलै) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह सर्व खासदार व आमदार उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठकीत केवळ आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याने पदाधिका-यांचा हिरमोड झाला.