नगर - लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत खासदार दिलीप गांधी यांनी दिले होते. मात्र, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे ही निवड महिनाभर लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून तत्कालीन जिल्हाध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. ढाकणे यांची नाराजी दूर करण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे नगरला आले होते. त्यांनी ढाकणे यांच्याशी चर्चा केली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. भाजप सोडून ढाकणे राष्ट्रवादीत दाखल झाले. मात्र, अजूनही भाजपचे जिल्हाध्यक्षपद रिक्तच आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपतील तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणा-यांची नावे चर्चेत आहेत. ढाकणे यांना शह देण्यासाठी पाथर्डीला जिल्हाध्यक्षपद देण्याची तयारी प्रारंभी दाखवण्यात आली होती. मात्र, मुंडे यांच्या निधनानंतर आता पाथर्डीला जिल्हाध्यक्षपद मिळेल की नाही याबाबत शंका आहे. मुंडे यांचे पाथर्डी तालुक्यातील पदाधिका-यांबरोबर अन्य पक्षांशीही जवळचे संबंध होते. भगवानगड येथे दर्शनासाठी आल्यानंतर मुंडे पाथर्डीतील नेत्यांशी चर्चा करत. परंतु आता मुंडे नसल्याने पाथर्डीला जिल्हाध्यक्षपद मिळणे अवघड आहे. या पदासाठी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे, भीमराव फुंदे, अशोक गर्जे, अॅड. दिनकर पालवे यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी निवडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. संघाशी संलग्नित असलेल्या नवीन चेह-यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याची भाजप कार्यकर्त्यांसह सर्वांनाच उत्सुकता आहे.
अजून चर्चा नाही...
जिल्हाध्यक्ष निवडीबाबत अजून निर्णय झालेला नाही. सध्या याबाबत कुठलीही प्राथमिक चर्चा सुरू नाही. येत्या महिनाभरात जिल्हाध्यक्षाची निवड होईल.
दिलीप गांधी, खासदार.
चंद्रशेखर कदम यांच्या नावाला अनुकूलता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीत तयार झालेले कदम हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपमधील सर्व गटांना सांभाळून घेण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळेल, असे दिसते.