आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षकांनी नगरच्या जागेची मागणी फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीत नगरची जागा भारतीय जनता पक्षाला मिळण्याची मागणी पक्षनिरीक्षक आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे फेटाळली. इतकेच नव्हे, तर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्तावही स्पष्टपणे फेटाळल्याने नगरमधील भाजपच्या इच्छुकांचा हिरमोड झाला. निमित्त होते भाजपच्या आढावा बैठकीचे.
ही फक्त आढावा बैठक असतानाही पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची हवा आधीच पसरल्याने जिल्हाभरातून इच्छुक आपल्या ‘बायोडाटा’ही सोबत आणला होता. या बैठकीपूर्वी मोठी उत्सुकता होती, ती नगरबद्दल. गेल्या काही दिवसांपासून नगरची जागा भाजपला मिळावी, यासाठी अनेक नेते निवेदने प्रसिद्धीस देत होते. या पार्श्वभूमीवर नगरमधील भाजपचे नेते अ‍ॅड. अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, शिवाजी लोंढे, संगीता खरमाळे आदींनी पक्षनिरीक्षकांकडे शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांच्या विरोधात जोरदार तक्रारी केल्या. राठोडच शहरात भाजप चालवतात,
दरवेळी त्यांच्यासमोर पक्ष झुकतो, ते मात्र भाजपच्या विरोधात प्रचार करून पक्षाचे नुकसान करतात. त्यामुळे नगरची जागा भाजपने लढवावी, किमान शिवसेनेला इथला उमेदवार तरी बदलावा, शहरात शिवसेना ‘सेटलमेंट सेना’ आहे, असा या नेत्यांचा सूर होता. काहींनी यावेळी उत्साहाने बंडखोरी करण्यास परवानगी देण्याचीही मागणी केली. मात्र, पाटील यांनी सर्व नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचा उमेदवार आपण कसा ठरवणार, असा सवाल करून पाटील यांनी शिवसेनचा कोणीही उमेदवार असला, तरी त्याचे काम करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. राठोड यांना थेट विरोध करण्यापेक्षा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हवा द्या, असेही त्यांनी आडपडद्याने सुचवले. एकूणच नगरच्या बाबतीत भाजपचे नेते आता काय भुमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातला विश्रामगृहावर गोंधळ
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर आयोजित भाजपच्या आढावा बैठकीतच काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजपमधील इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शक्तिप्रदर्शनासाठी आलेल्या नेवासे येथील भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षनिरीक्षकांसमोर केलेल्या घोषणाबाजीमुळे मोठा गोंधळ उडाल्याने पक्षनिरीक्षकांना बैठकीतून बाहेर येऊन दोन्ही पक्षांतील इच्छुकांना व कार्यकर्त्यांना शांत करावे लागले.
नेवासे तालुक्याचे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे भाजपकडून इच्छुक आहेत. ते पक्षनिरीक्षक व आमदार चंद्रकांत पाटील व माधुरी मिसाळ यांना भेटण्यासाठी बैठक हॉलसमोर उभे असताना त्यांच्या समर्थकांनी उपस्थित मुरकुटे यांच्या नावाने घोषणा दिल्या. त्यावेळी उपस्थित असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकरराव गर्जे व ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल फाटके यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घुसखोरी बंद करा, काँग्रेस हटाव देश बचाव अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संतापलेल्या मुरकुटे समर्थकांनी ‘बाळासाहेब मुरकुटे आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे दोन्ही गटांत चांगलीच जुंपली. या घोषणाबाजीमुळे हॉलबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घोषणाबाजीनंतर पक्षनिरीक्षक चंद्रकांत पाटील व शहर व जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी बाहेर येऊन या दोन्ही पक्षांतील इच्छुकांना व कार्यकर्त्यांना शांत केले. फाटके हे मुरकुटे समर्थकांना म्हणाले, आधी काम दाखवा, मग तिकीट मिळवा. यावरूनही काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर निरीक्षक पाटील म्हणाले, भाजपच्ो निष्ठावंत अगोदर आतमध्ये येतील. बाहेरून पक्षात येणा-या उमेदवारी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले. आमदार राम शिंदे यांनीही निष्ठावंतांनाच संधी दिली जाईल, असे सांगितल्यानंतर तणाव निवळला. या गोंधळामुळे हॉलबाहेर बराच वेळ ताटकळत उभे असलेले नेवासे येथील त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव घाडगे यांनी बाहेर जाऊन शांत राहणेच पसंत केले.

व्हॉटस् अ‍ॅप नको...
नेवासे तालुक्यातील भाजपचे एक पदाधिकारी लेटरपॅडवर लिखाण करत बसले होते. शेजारी बसलेल्या कार्यकर्त्याने त्या पदाधिका-याला सांगितले, साहेब, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुलाखतीला आले आहेत. ते आपल्याबरोबर फोटो काढून व्हॉटस् अ‍ॅपवर टाकतील सगळीकडे तुमचे आम्हाला समर्थक असल्याचे सांगतील. त्यामुळे ते मुलाखतीला गेल्यावर तुम्ही जाऊ नका, अशी सूचना त्या कार्यकर्त्याने त्या पदाधिका-याला दिली.

गर्जेंनी रोखले आगरकरांना
पदाधिका-यांबरोबर चर्चा सुरू होण्यापूर्वी निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. आमदार राम शिंदे. शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सुनील रामदासी, शिवाजी शेलार, चंद्रशेखर कदम या वेळी उपस्थित होते. आगरकर यांचे भाषण सुरू असताना पाथर्डी येथील मुकुंद गर्जे यांनी आगकरांना अडवत मुंडे साहेबांना विसरू नका, असे सांगितले. त्यानंतर आमदार पाटील यांनी सर्वांनी दोन मिनिटे शांत उभे राहून मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्याची विनंती केली. त्यानंतर बोलताना पाटील म्हणाले, मुंडे व माझे 30 वर्षांपूर्वीचे नाते आहे. दिल्लीतील मुंडे यांच्या अपघाताच्या दीड महिन्यापूर्वी मुंडे यांच्याबरोबर सोलापूर येथे दीड तास चर्चा झाली. कोअर कमिटीत आमदार पंकजा मुंडे यांना घेण्यात आले आहे. त्यामुळे हा विषय आता संपला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
इच्छुकांच्या शक्तिप्रदर्शनामुळे विश्रामगृहाला जत्रेचे स्वरूप

वेळ सकाळी 11.30 ची. शासकीय विश्रामगृहाच्या हॉलबाहेर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर हे निवडक दोन-तीन कार्यकर्त्यांबरोबर पदाधिकारी व आमदार माधुरी मिसाळ यांची प्रतीक्षा करत उभे होते. आमदार चंद्रकांत पाटील अगोदरच शासकीय विश्रामगृहावर आले होते. आमदार मिसाळ यांच्या आगमनानंतर विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली.
दुपारी दीड वाजता विश्रामगृहाच्या आजूबाजूला लावण्यात आलेली आलिशान वाहने, कार्यकर्त्यांमध्ये घोळक्या-घोळक्यात सुरू असलेली चर्चा, इच्छुक असलेल्या उमेदवार यांच्या हातातील फायली त्यामुळे विश्रामगृहाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. मोदी लाटेचा आधार घेऊन मुलाखत देण्यासाठी इच्छुकांबरोबर विश्रामगृहावर येत होते. अनेकजण फाईलमधील काही कागदपत्रे कमी नाहीत, ना याची खात्री दुस-या इच्छुकांकडून करून घेत होते, तर काही जण आपल्याला आता तिकीट मिळाले, असे सांगत होते.
जो-तो आमदारकीचीच चर्चा करत होता. हॉलमध्ये पक्षनिरीक्षक पाटील, मिसाळ, आमदार शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे आगमन झाले. आगरकर यांनी पाटील व मिसाळ यांचा सत्कार केला. त्यानंतर कार्यकर्ते व पदाधिका-यांशी चर्चा करण्यास सुरुवात झाली. अकोले तालुक्यापासून चर्चेला सुरुवात करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. चर्चेसाठी आलेले बहुतांशी पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते.