आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूरमध्ये भाजपचा आत्मक्लेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजपने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपत जल्लोष होणे अपेक्षित असताना विरोध होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करत श्रीरामपुरात शुक्रवारी ‘आत्मक्लेष' केला गेला. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणत या पक्षातील अनेकांना तुरूंगात डांबण्याचा इशारा देणाऱ्या भाजपचा मनसुबा काही औरच असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी, सुनील मुथ्था, शम्मी गुलाटी, कुमार जंगम (राहाता), वैभव मुळे (राहुरी), सुनील दातीर, दत्ता पवार (श्रीरामपूर), व्यापारी आघाडीचे अध्यक्ष कांतिलाल बोकडिया, दिगंबर ढवळे, सुवालाल लुक्कड, रवींद्र खटोड, राजेंद्र कांबळे, संजय पांडे, किरण लुणिया, अनिल भनगडे, विष्णुपंत डावरे, अजित डावखर, दीपक दुग्गड यांनी आत्मक्लेष आंदोलनात भाग घेतला.

आतापर्यंत तत्त्वाचे व ध्येयवादाचे राजकारण केले. सत्तेसाठी कुठेही व कुणाशीही तडजोडीचे राजकारण केले नाही. भाजपच्या अनेक पिढ्या सत्तेशिवाय देशात व राज्यात सातत्याने लढत राहिल्या. त्यातून पक्ष उभा राहिला. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार मोहीम उघडली होती. अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. सत्ता येताच त्यांना जेलमध्ये बसवण्याची भूमिका फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे मांडली होती.तथापि, अशा पक्षाच्या कुबड्या घेऊन फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. राष्ट्रवादीने केलेले घोटाळे झाकण्यासाठीच भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय झुगारणे गरजेचे होते. मात्र, भ्रष्टाचार करणाऱ्यांना बरोबर घेतल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. भाजपची प्रतिमा सुधारण्याऐवजी मलिन होण्याची दाट शक्यता आहे, अशी संतप्त भावना आत्मक्लेष आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.