आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Separately Will Contest Aurangabad Municipal Corporation

भाजपची स्वबळाची तयारी पूर्ण, आदेशाची प्रतीक्षा ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा, असा आदेश वरिष्ठांकडून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना आल्याचे वृत्त धडकत असतानाच भाजपने मात्र स्वबळाची तयारी पूर्ण केल्याचे समजते. शिवसेनेबरोबरच भाजपनेही सर्वच वाॅर्डातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानुसार त्यांनी तयारी केली असून आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा असल्याचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभीपासूनच भाजपच्या वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांना युती धर्माचे पालन करण्याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती. युती करण्याची आमची इच्छा आहे, भाजप काय ते ठरवील, असे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही युती व्हायलाच हवी, असे वक्तव्य प्रसिद्धिमाध्यमांसमोर केले. मात्र त्यानंतरही भाजप पदाधिकाऱ्यांच्या कृतीत बदल झाला नाही. युती जागा वाटपाच्या बैठकीत ते त्यांच्या जुन्याच मागण्यांवर अडून होते.

गेले दोन दिवस सेनेचे पदाधिकारी चर्चेसाठी मुंबईला गेले होते. परंतु भाजप पदाधिकारी शहरातच तळ ठोकून होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवस त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर सर्वच वाॅर्डातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यात आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी महापौर डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्यासह कोअर कमिटीतील सदस्यांचा समावेश आहे. ही सर्व मंडळी यादी तयार करण्याचे काम करत आहेत.

वाद निर्माण करण्याचा प्रयत्न : पहिल्याच बैठकीत शिवसेनेला सोडण्यात आलेल्या गुलमंडी या वाॅर्डावर दानवे यांनी गुलमंडी हे शहराचे नाक आहे, ते सेनेला का बरे द्यायचे, असा सवाल केला होता. त्यामुळे चर्चा करणारे वेगळे बोलतात अन् नेते वेगळे म्हणतात, असे चित्र निर्माण झाले होते. वाद कायम ठेवून शेवटच्या क्षणी युती तोडण्याची ही खेळी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एकूणच युती होण्याची शक्यता धूसर होत चालली असल्याचे समजते.

श्रेष्ठींनी स्वबळावर लढवण्याचे पूर्वीच ठरवले
सेनेला अपेक्षित असलेल्या वाॅर्डातील उमेदवारही भाजपने निश्चित केल्याचे दिसून येत आहे. युती झाली तर ठीक, अन्यथा ऐनवेळी घाई नको म्हणून असे करण्यात येत असल्याचा दावा भाजपच्या धुरिणांकडून करण्यात येत असला तरी उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या श्रेष्ठींनी स्वबळावर लढवण्याचे पूर्वीच ठरवले असल्याने ही तयारी करण्यात येत आहे.