आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वबळासाठी भाजपची आज तातडीची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- युती तोडायची नाही, असे भाजप व शिवसेनेचे नेते जाहीरपणे सांगत असले, तरी भाजपने मात्र स्वबळ जमवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सोमवारी (२२ सप्टेंबर) भाजप पदाधिका-यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात भाजपची ताकद व असलेले उमेदवार याबाबत चर्चा होणार आहे.
दरम्यान, उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर बंडखोरीची शक्यता असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब लावत आहेत.
शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेला जागावाटपाबाबत घोळ अजून कायम आहे. दोन्ही पक्ष युती करण्यावर ठाम असले, तरी जागावाटपाबाबत मात्र मतभेद आहेत.एकीकडे जागांवरून दोन्ही पक्ष अडलेले असताना दुसरीकडे भाजपने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. स्वत:ची ताकद अजमावण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सोमवारी पदाधिका-यांची बैठक घेण्याची सूचना प्रदेशने केली आहे. या बैठकीत मतदारसंघातील भाजपची ताकद, उमेदवार, अन्य पक्षांची परिस्थिती, तसेच तातडीने द्यावयाचे उमेदवार यावर चर्चा होणार आहे.
भाजपच्या तुलनेत शिवसेना मात्र अजून गाफील असून त्यांचे उमेदवार निश्चित असले, तरी जागावाटपाचे घोडे अडल्याने शिवसैनिक संभ्रमात आहेत. दरम्यान, बहुतांशी मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी प्रचार चालू केला आहे. आमदार राठोड, राष्ट्रवादीचे महापौर संग्राम जगताप व काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांनी प्रचार सुरू केला आहे.
अकरा वाजता बैठक
या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या आगामी वाटचालीबाबतही चर्चा होणार आहे. गांधी मैदानातील शहर भाजपच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता पदाधिकारी, नगरसेवक यांची बैठक सुरू होईल. अनिल गट्टाणी, उपाध्यक्ष, शहर भाजप