आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बाजारात जाणारे 720 लिटर रॉकेल पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्वस्त धान्य दुकानातून वितरीत करण्यासाठीचे निळे रॉकेल काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. बुरुडगाव रस्ता परिसरातील भवानीनगर येथे गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. कोतवाली पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय कृष्णमूर्ती हापसे यांचे भवानीनगरमध्ये रॉकेलचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी शिधापत्रिकाधारकांसाठीचे रॉकेल एका टेम्पोतून काळ्या बाजारात नेले जात असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी दुकानाकडे धाव घेऊन विचारणा केली असता दुकानचालकासह त्याचे साथीदार टेम्पोसह पसार झाले. संतप्त नागरिकांनी रॉकेलचे दोन बॅरल घेऊन कोतवाली पोलिस ठाणे गाठले व तक्रार नोंदवून घेण्याची मागणी केली. पोलिसांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. पुरवठा विभागाचे अधिकारी, पोलिस व नागरिक संबंधित दुकानाकडे गेले. उर्वरित दोन बॅरल व एक अँक्टिव्हा दुचाकी ताब्यात घेण्यात आली.

राजेंद्र गंगाराम जोग यांच्या फिर्यादीवरून संजय हापसे, सुधीर सज्रेराव डांगळे व अज्ञात चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बारा हजार रुपये किमतीचे सव्वासातशे लिटर रॉकेलसह 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

दुकान सील न केल्याने संगनमताचा संशय
पुरवठा विभाग व पोलिसांच्या उपस्थितीत दोन बॅरल व दुचाकी हस्तगत केल्यानंतर संबंधित रॉकेलविक्रीचे दुकान सील करण्याची मागणी नागरिकांनी केली. मात्र, शासकीय अधिकार्‍यांनी याला नकार देत काढता पाय घेतला. हक्काचे रॉकेल काळ्याबाजारात जात असल्याचे लक्षात आणून देऊनही ठोस कारवाई होत नसून पुरवठा विभाग, पोलिसांचे दुकानदारांशी संगनमत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.