आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Black Market To Control On Five Team At Jamkhed Ahmednagar Dist.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार रोखण्यासाठी पथके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना खते व बियाणे वेळेत मिळावीत, यासाठी तालुका कृषी कार्यालयामार्फत 5 जणांच्या एका भरारी पथकाची स्थापना केली आहे. तसेच प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर कृषी सहायकांची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी तालुक्यात 30 कृषी सहायक व त्यांच्या मदतीसाठी चार सुपरवायझरांची नेमणूक करण्यात आली आहे.
तालुक्यात कपाशीच्या कनक वाणाची 2 हजार 658 पाकिटे उपलब्ध झाली आहेत. मात्र, त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने 930 रुपये किंमतीच्या एका पाकिटाची अडीच ते तीन हजार रुपयांना काळ्याबाजारात विक्री होत आहे. कनक वाणाव्यतिरिक्त इतर 22 प्रकारच्या वाणांची 24 हजार पाकिटे उपलब्ध असली तरी शेतकर्‍यांचा कनककडेच ओढा आहे. तालुक्यात 112 परवानाधारक कृषी सेवा केंद्रे असली तरी त्यापैकी फक्त 65 कृषी सेवा केंद्रांतूनच खते व बियाण्यांची विक्री होत आहे. मात्र, या दुकानांव्यतिरिक्त अन्यत्रही कनक बियाण्यांची पाकिटे मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, पाच जणांचे भरारी पथक नेमण्यात आले आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकारी डी. पी. नेटके, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी बी. एम. पवार व तालुका कृषी कार्यालयातील तीन मंडल कृषी अधिकार्‍यांचा समावेश आहे. हे पथक कृषी सेवा केंद्रांची तपासणी करणे, रेकॉर्ड तपासणे, शिल्लक माल फलकावर लिहिलेला आहे का? याची तपासणी करणे आदी कामे करणार आहे. यामध्ये दोषी आढळल्यास कृषी केंद्राचे परवाने रद्द केले जातील. याशिवाय तालुक्यात 30 कृषी सहायकांची नेमणूक केली असून, त्यांच्या मदतीस 4 सुपरवायझर देण्यात आले आहेत. बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी हे पथक काम करणार आहे. तालुक्यात सुमारे 32 हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. पावसाने साथ दिल्यास यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. खरिपाच्या बाजरी, तूर, मूग, सूर्यफूल, उडीद, सोयाबीन आदी पिकांना प्राधान्य दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून कापसाला चांगला हमीभाव मिळत असल्याने तालुक्यातील कपाशी पिकाच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तालुक्यात 11 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. यंदा पावसाच्या प्रमाणावर कपाशी लागवड अवलंबून आहे. योग्य वेळी पाऊस झाल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा कपाशी क्षेत्रात वाढ होऊ शकते.