आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा वाहतूक चालू देणार नाही- आर.डी. शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-जिल्हा अँपेरिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात सुरू असलेले आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले. तत्पूर्वीच्या बैठकीत विनापरवाना वाहनांवर कारवाई स्थगित करण्याची संघटनेच्या वतीने करण्यात आलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली. कोणत्याही परिस्थितीत बेकायदा वाहतुकीला संरक्षण दिले जाणार नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी आंदोलकांना ठणकावून सांगितले. झुंडशाहीच्या जोरावर प्रशासनाला वेठीस धरण्याचा संघटनेचा प्रयत्न अधीक्षकांच्या कणखर भूमिकेमुळे अयशस्वी झाला.

जिल्हास्तरीय परिवहन समितीच्या आदेशानुसार अवैध प्रवासी वाहतूक व नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर सध्या कारवाई सुरू आहे. परवाने देण्याबाबत धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावरच होऊ शकतो. विनापरवाना प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई सुरूच राहील. कायदा व सुव्यवस्थेचा प्रo्न निर्माण करून बेकायदेशीर गोष्टींना परवानगी मागत आहात. परंतु अशी कोणतीही परवानगी आमच्या स्तरावर देता येणार नाही, असे ठणकावत अधीक्षक शिंदे यांनी वाहतूक सुरळीत करण्यात संघटनेने कोणते योगदान दिले, असा जाब संघटनेच्या पदाधिकार्‍यांना विचारला. चुकीची कारवाई होत असेल, तर माहिती द्या, संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारू, असा विश्वासही त्यांनी या पदाधिकार्‍यांना दिला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनीही आंदोलकांच्या मागण्यांबाबत निर्णय राज्य शासनच घेऊ शकते, असे स्पष्ट केले.

कारवाई शिथील करण्याच्या मागणीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बुधवारी अँपेरिक्षा चालकांनी उपोषण केले. रिक्षाचालकांशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष अफजल सय्यद.

आंदोलन सुरूच
स्थानिक पातळीवर निर्णय होणार नाही याची आम्हालाही जाणीव आहे. त्यामुळे राज्यपातळीवर हे आंदोलन घेऊन जाणार आहोत. सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्हा प्रशासनाने कारवाईत शिथिलता आणण्याची आवश्यकता होती.’’ अफजल सय्यद, अध्यक्ष, जिल्हा अँपे रिक्षा चालक-मालक संघटना.

प्रस्ताव पाठवले
सन 2011 मध्ये 2,600 रिक्षा परवान्यांची मागणी केली आहे. याशिवाय रद्द करण्यात आलेल्या 3,790 परवान्यांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत शासनाला 1 जानेवारी 2013 रोजी कळवले आहे. मार्चअखेरपूर्वी यावर निर्णय अपेक्षित आहे. निर्णयानंतर कोटा पद्धतीने परवान्यांचे वाटप केले जाईल. अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई चालूच राहील.’’ विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

बर्‍याच तक्रारी आहेत
अँपेरिक्षाचालकांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी मला व जिल्हाधिकार्‍यांना मिळाल्या आहेत. त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यात अँपेरिक्षांचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात स्वत:हून पुढाकार घ्या. चुकीचे वागलात, तर कारवाई होणारच..’’ आर. डी. शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक.