आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिरांच्या आयोजकांचा ‘अष्टविनायक’तर्फे गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विविध कारणांनी रुग्णांसाठी रक्ताची गरज वाढत असताना रक्तपिशव्यांचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत अष्टविनायक ब्लड बँकेने गेल्या वर्षभरात नगरकरांना आपलेसे करीत रक्त देणार्‍या व घेणार्‍यांचा राखलेला समन्वय महत्त्वाचा आहे. समाजातील जाती-धर्माच्या भिंती तोडून माणुसकीचे नाते जोडणार्‍या रक्तदानाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी नुकतेच केले.

प्रोफेसर कॉलनी चौकातील अष्टविनायक ब्लड बँकेच्या वतीने गेल्या वर्षभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या शंभराहून अधिक संस्था व व्यक्तींना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी गडाख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. एस. दीपक होते. अष्टविनायक ब्लड बँकेचे संचालक डॉ. शैलेंद्र पाटणकर, डॉ. मेघना पाटणकर, डॉ. दिलीप दाणे, डॉ. मिलिंद पोळ, डॉ. ललितराम जोशी, डॉ. वैशाली किरण, डॉ. बाळासाहेब देवकर या वेळी उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या दहावीच्या 1989 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ. शैलेंद्र पाटणकर यांनी सांगितले की, रक्तपेढीने सामाजिक बळावर असंख्य रुग्णांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षभरात विविध शिबिरांतून सुमारे 5000 रक्तपिशव्यांचे संकलन करून 6000 जणांना रक्ताचे वितरण करण्यात आले. 1 ऑगस्टपासून रक्तपेढीच्या वतीने सर्व रुग्णांच्या सोयीसाठी मोफत कुरियर सेवा सुरू केली जाणार आहे. रुग्णाचे ब्लड सॅम्पल कोल्ड बॉक्समध्ये बुकिंग व क्रॉसमॅचकरिता रक्तपेढीतील कर्मचारी हॉस्पिटलमध्ये येऊन स्वत: घेऊन जातील व रुग्णाला ज्या वेळी रक्तपिशवीची गरज असेल त्या वेळी हॉस्पिटलमध्ये रक्तपिशवी पोहोच करतील. ही सेवा रुग्णांच्या सोयीसाठी नि:शुल्क ठेवण्यात आली आहे. या सेवेसाठी (0241) 2421334, 2421335 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. दीपक म्हणाले, एका रक्तदानातून 3 रुग्णांचे प्राण वाचवले जातात. सातत्याने रक्तदान केल्यास हृदयरोग, कर्करोग, तसेच लठ्ठपणा टाळण्यास मदत होते. अष्टविनायकने सातत्यपूर्ण प्रयत्नांतून जिल्ह्यात केलेली क्रांती लोकाभिमुख आहे. नगर शहर, जिल्हा तसेच बीडमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार्‍या व्यक्तींचा या वेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघना पाटणकर यांनी केले. परिचय डॉ. मिलिंद पोळ व डॉ. जोशी यांनी करून दिला. या वेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व रक्तदाते उपस्थित होते.