आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट अपंग शिक्षक प्रकरण: 93जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल; 95 हजार कागदपत्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण 93 जणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आले असून 95 हजार कागदपत्रे दोषारोपपत्रास जोडण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील 76 शिक्षकांनी प्रशासकिय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे जून 2012 मध्ये उघडकीस आले. या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, फौजदारी कारवाई टाळण्यात आली. जिल्हा रुग्णालय व पुण्याच्या ससून रुग्णालयाकडून केलेल्या पडताळणीत प्रमाणपत्रे बनावट आढळली. संबंधित शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गेंट्याल यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दिली. तत्कालिन शिक्षणाधिकार्‍यांनी डिसेंबर 2012 मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून 76 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित शिक्षक, प्रमाणपत्रे मिळवून देणारे मध्यस्थ व जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर अशा 97 जणांना अटक करुन तपास करण्यात आला. काही डॉक्टरांचेही जबाब नोंदवण्यात आले. पाचजणांविरुद्ध पुरावा न मिळाल्याने 93 जणांविरुद्ध बुधवारी आरोपपत्र सादर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.

यात 76 प्राथमिक शिक्षक, जिल्हा रुग्णालयातील 4 डॉक्टर व 13 मध्यस्थांचा आरोपपत्रामध्ये समावेश आहे. दोषारोपपत्रासोबत 95 हजार कागदपत्र जोडण्यात आली आहेत. एक टेम्पो भरून ही कागदपत्रे न्यायालयात आणण्यात आली. जागेअभावी कागदपत्रे ठेवण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.