आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या कलावंतांची ‘बॉलीवूड’ला धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरचे चित्र-शिल्पकार शुभंकर कांबळे त्यांची पत्नी मोना यांनी चित्र शिल्पसंगमातून केलेल्या कलाकृतींना बॉलीवूडमधील दिग्गज कलावंतांनी दाद दिली. कांबळे दांपत्याला त्यांच्या कलाकृतींसह निमंत्रण पाठवले जात आहे. शाहरुख खानबरोबरचा झळकलेला त्यांचा ‘कॉमेडी नाइट्स बचाव’ हा ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमाचे प्रसारण ला रात्री दहा वाजता होणार आहे.
चित्रकार आजोबा, प्रसिद्ध शिल्पकार वडील प्रमोद कांबळे यांच्यापासून कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या शुभंकर यांनी आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ते मोना दोघेही कलावंत आहेत. शुभंकर चित्र शिल्पकार आहेत. मोना चित्रकार आहेत. दोघांनी नगरमध्ये राहून बॉलीवूडशी आपले घनिष्ट संबंध निर्माण केले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही. केवळ आपल्या कलेवर विश्वास ठेवत त्यांनी आघाडीचे कलाकार अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख, जॅकी श्रॉफ, हेमामालिनी, रणवीर सिंग, दीपिका, नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यावर प्रभाव पाडला आहे.

शुभंकर मोना यांच्या या वेगळ्या कलाप्रवासाची सुरुवात दीड वर्षापूर्वी झाली. त्यांनी कलर्स वाहिनीच्या ‘शमिताभ’ या चित्रपटासाठी हँडपेंटेड थ्रीडी पोस्टर तयार केले. ते घेऊन ते कलर्सच्या कार्यालयात गेले. ते पोस्टर त्यांना खूप आवडले. त्यांनी कांबळे यांना ‘कॉमेडी नाइट्स वुईथ कपिल’च्या सेटवर नेले. त्यांचे पोस्टर अमिताभ यांना खूप आवडले. शुभंकर यांनी अमिताभचे स्वतंत्र रंगीत स्केच केले होेते. ते त्यांना खूप आवडले. त्यावर त्यांनी स्वाक्षरी केली. आज ते स्केच शुभंकर यांचा मोलाचा ठेवा बनले आहे.

त्यानंतर शुभंकर मोना यांनी "बजरंगी भाईजान'चे पोस्टर तयार करून सलमान खानच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. त्यांनी शुभंकर यांना दोन-तीन दिवसांत सलमानला भेटण्याची संधी देऊ, असा निरोप पाठवला. खरोखरच दोन दिवसांनी शुभंकर मोना यांना वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओत सलमानला भेटण्याची संधी मिळाली. सलमानने दीड तास गप्पा मारल्या. सलमान स्वत: चित्रकार आहे. त्यामुळे त्याने अत्यंत जिव्हाळ्याने शुभंकर मोनाकडून चित्र शिल्पकलेची माहिती घेतली. शुभंकर यांनी आपल्या कामाची छायाचित्रे नेली होती. प्रत्येक कामाबद्दल सलमानने माहिती विचारली. कोणत्या चित्रासाठी कोणते रंग वापरले हेही त्याने विचारले. सलमाननेही आपल्या चित्रांची छायाचित्रे शुभंकरला दाखवली. त्याने महादेवाचे अतिशय सुंदर चित्र काढल्याचे शुभंकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. त्या वेळी सलमानने चक्क आपल्याला शिल्पकलेत रस असल्याचे सांगत ते कांबळेंकडून शिकण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या त्याच्या ‘सुलतान’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. ते संपल्यावर तो त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर लवकरच शुभंकरला शिल्पकलेचे धडे घेण्यासाठी बोलावणार असल्याची माहिती शुभंकर यांनी दिली.

शुभंकर मोना यांनी "बाजीराव-मस्तानी'च्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाइट्स बचाव’ कार्यक्रमात एक सुंदर कलाकृती तयार केली. या कार्यक्रमातच रणवीर सिंग दीपिकाबरोबर झळकण्याची संधी दोघांना मिळाली. ही कलाकृती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. मोना यांनी काढलेले चित्र मात्र दीपिका घरी घेऊन गेली.
शुभंकर कांबळे यांनी काढलेल्या स्केचवर सही करताना अमिताभ बच्चन.

कलावंतांच्या घरी शुभंकर-मोनाच्या कलाकृती
आतापर्यंत शुभंकर यांनी बनवलेल्या हँडमेड थ्रीडी कलाकृती कलावंताचे दिवाणखाने सजवत आहेत. कपिल शर्माच्या आईचे, हेमामालिनीचे तसेच सचिन त्याचे गुरू आचरेकर यांची चित्रे संबंधितांना खूप आवडली आहेत. याशिवाय जॅकी श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी कांबळे यांच्या कलाकृती घरी नेल्या आहेत. कपिल शर्मा आपल्या कार्यक्रमातील चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी कांबळे दांपत्याला बोलावण्यासाठी प्रत्येक वेळी आग्रही राहत आहे.

शाहरुख खानसाठी विशेष कलाकृती
हिंदीचित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’साठी चक्क शुभंकर मोना यांना निमंत्रण देण्यात आले. त्यासाठी त्यांनी शाहरुखसाठी चित्र शिल्प यांचा संयोगातून घालून कलाकृती बनवली. ती शाखरुखला इतकी आवडली की, कार्यक्रमानंतर ती कलाकृती आपल्या घरी नेली. शुभंकरशी संवाद साधताना त्याने त्यांचे खूप कौतुक करत अशा तरुण कलावंतांना भेटण्यास आपल्याला खूप आवडत असल्याचे नमूद केल्याची आठवण शुभंकर यांनी सांगितली.