आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोजगार हमी योजनेत गैरव्यवहार करणा-यांवर गुन्हे दाखल करण्‍याचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - तालुक्यातील देवठाणचे सरपंच, ग्रामसेवक व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ठेकेदारांनी केलेल्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी दिले आहेत. त्यामुळे रोहयो कामात अनियमितता आढळलेल्या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामसेवक धास्तावले आहेत. फक्त ग्रामसेवकांना दोषी न धरता सर्वांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन ग्रामसेवक संघटनेने मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्र्यांना दिले आहे.

रोहयोची कामे ग्रामपंचायत अंतर्गत झाल्याने त्यात सचिव म्हणून ग्रामसेवकांची जबाबदारी मोठी ठरते. देवठाणच्या धर्तीवर काम करण्यास त्यांनी नकार दिला आहे. या प्रकरणात अडकायला नको म्हणून ग्रामसेवक संघटनेने यात हस्तक्षेप केला आहे. केवळ ग्रामसेवकांना निलंबित करून चालणार नाही, योजनेत अनियमितता होण्यास अधिकारीच जबाबदार आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनानेही नि:पक्षपणे चौकशी केल्यास ग्रामसेवकांवर रोजगार हमीच्या अंमलबजावणीत किती दबाव होता, त्याचीही शहानिशा होईल व खरे ते सर्वांसमोर येईल, असे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे.

देवठाण रोहयोप्रकरणी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, ग्रामसेवक टी. डी. कवडे व रोजगार सेवकावर फौजदारी खटले दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. मात्र, राजकीय दबावापोटी अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामसेवक कवडे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा कार्यभार अन्य ग्रामसेवकाकडे देण्यात आला आहे. फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारात इतर ग्रामसेवकांना अडकवू नये म्हणून ग्रामसेवक संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील तीन व जिल्ह्यातील 37 ग्रामसेवकांच्या प्रशासनाकडून चौकशा सुरू आहेत. अकोले तालुक्यातील देवठाण, पाडाळणे आणि ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.

मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांना निवेदन
ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी, तसेच ग्रामसेवक एकनाथ ढाकणे, आर. पी. डुबे, एम. के. दहिफळे, परमेश्वर सुद्रिक, सुनील नागरे, सुनील लांडगे, राजेंद्र पावसे, वृक्षाली नवले, गंगा राऊत, सुभाष गज्रे, रमेश गायके, विलास काकडे, अशोक नरसाळे, सुरेंद्र बर्डे, गणपत शेटे, वसंत थोरात, संजय राठोड, बाळासाहेब आंबरे यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी व संबंधितांना निवेदन पाठवले आहे.

रोजगार हमी योजनेच्या गैरव्यवहारात एकतर्फी फक्त ग्रामसेवकांवर कारवाई होऊन त्यांना निलंबित करणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


भ्रष्टाचारी कर्मचार्‍याच्या पाठीशी संघटना नाही
अकोले तालुक्यातील विकासकामांना ग्रामसेवकांनी प्राधान्यक्रम देऊन गतीने कामे केली. यामध्ये काही अनियमितता राहिली असेल, तर तो कामकाजाचा भाग आहे. त्यामुळे कामातील अनियमितता दूर केली जाईल. जाणीवपूर्वक कोणत्याही ग्रामसेवकाने कामात टाळाटाळ केली नाही. पदाधिकार्‍यांच्या आग्रहामुळे व दबावाखाली काही ग्रामसेवकांकडून अनियमिततेची कामे झाली असतील, तर त्यात फक्त ग्रामसेवकाला दोषी धरता येणार नाही. कोणत्याही भ्रष्टाचारी कर्मचार्‍याला संघटना पाठीशी घालणार नाही. मात्र, त्यांच्यावर होत असलेला अन्याय सहन करणार नाही. - सुभाष गर्जे, अकोले तालुकाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना


अन्याय झाल्यास पुन्हा आंदोलन
रोजगार हमी योजनेत सक्तीने काम करण्यास भाग पाडल्यानंतर आता चौकशीत ग्रामसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. ग्रामसेवक संघटना भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही. परंतु निव्वळ चौकशीचा फार्स करून एकट्या ग्रामसेवकाचा बळी दिला जात असेल, तर तो अन्याय सहन करणार नाही. रोपवाटिका, ग्रामपंचायत कार्यालये, वैयक्तिक शौचालयांसह रोजगार हमी योजनेतून हजारो लोकांना रोजगार दिला आहे. तांत्रिक चुका व अनियमितता म्हणजे भ्रष्टाचार झाला, असे नाही. आमचे ग्रामसेवकांवर अन्याय झाल्यास पुन्हा रोजगार हमी योजनेबाबत आंदोलन छेडले जाईल. - एकनाथ ढाकणे, मानद अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना, अहमदनगर