आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा: ट्रॅव्हल कंपनीकडून कोट्यवधींचा गंडा, परदेशवारी घडवण्याचे आमिष दाखवून लूटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर: परदेशवारीचेआमिष दाखवून प्रवाशांची लूट करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. नगरमध्ये अशा स्वरूपाचे काही गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार थांबलेेले नाहीत. हिब्ज हॉलिडेज नावाची ट्रॅव्हल्स कंपनी स्थापन करून १६ जणांनी राज्यातील हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. सात जिल्ह्यांतील लोक फसले गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ७८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

राजेंद्र पोपट ढवळे (४७, मखरेवाडी, ता. श्रीगोंदे) यांनी याप्रकरणी १५ जुलैला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पाच जणांना २५ जुलैला अटक केली. गणेश शिंदे, अरिफ मर्चट, महेश पालकर, प्रभाकर दळवी युवराज पाटील अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. अविनाश लक्ष्मण आचरेकर या आरोपीचे निधन झाले आहे. आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायदा १९९९ चे कलम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करत आहेत.

आरोपींनी हिब्ज हॉलिडेज अंतर्गत दहा कंपन्या स्थापन करून आरोपींनी बनावट नोंदणी कागदपत्र तयार केली. काही दिवसांनी लोकांचा विश्वास संपादन करून कंपनीकडून पर्यटन व्यवसायांतर्गत पर्यटन पॅकेजेस इलेक्ट्रॉनिक व्यवसायांतर्गत दैनंदिन वस्तूंबरोबर वाढीव ४० टक्के लाभांश देण्याचे आश्वासन त्यांनी लोकांना दिले. हा लाभांश जास्तीत जास्त १७ महिन्यांच्या आत देण्याचे आमिष दाखवले. लोकांकडून ७८ लाख ३८ हजार ४०० रुपये गोळा केले. नंतर मात्र लोकांना मूळ रक्कम लाभांशसह परतफेड केली नाही. हा प्रकार १५ जुलै २०१० ते २८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत घडला.

कंपनीच्या सोळा संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. दहावी-बारावीनंतर बेरोजगार म्हणून फिरत असलेल्या काही मित्रांना सोबत घेत एमबीए झालेल्या एकाने ही कंपनी स्थापन केली. हे सर्व संचालक मुंबई, पुणे, कोकण विभागातील अाहेत. पाचजणांना अटक झाली असून इतर आरोपी फरार आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.

यांच्यावर फसवणुकीचा आरोप
मोहनवसंत पाटील (दादर, मुंबई), गणेश बाळू शिंदे (३३, जी. डी. आंबेडकर रोड, मुंबई), दिनेश बळवंत सपकाळ (लोअर परेल, मुंबई), अरिफ अमिनुद्दीन मर्चंट (४७, चिंचबंदर, मुंबई), महेश दत्तात्रेय पालकर (३७, खेड, रत्नागिरी), प्रभाकर धाकटोबा दळवी (३७, खेड, रत्नागिरी), यमचंद नारायण बनसोडे (खेड, रत्नागिरी), अविनाश लक्ष्मण आचरेकर (मुंबई सिटी), गुरुदास जनार्दन सावंत (मानगाव, कुडाळ), मंगेश मधुकर शेरलेकर (कुडाळ, सिंधुदुर्ग), युवराज सताप्पा पाटील (३२, लालबाग, मुंबई), जयंत मच्छिंद्र वाडकर (सेवरी, मुंबई), राजन मच्छिंद्र चाकणे (सेवरी, मुंबई), दिनेश हिरामण बोरसे (अंधेरी, मुंबई), किरण सुधाकर आरेकर (हिंजवडी, पुणे), चेतन विनायक सावंत (कुडाळ, सिंधुदुर्ग).

७८.३६ लाख - जिल्ह्यातील एकूण फसवणूक
०५ वर्षांपासून फसवणूक
१० आरोपी फरार
०७ जिल्ह्यात फसवणूक
०५ आरोपींना अटक
०१ आरोपीचे निधन
१६ संचालक आरोपी