आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५० फूट खोल बोअरमध्ये अडकलेल्या मुलाला वाचविले, राहुरी येथील प्रकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी- तालुक्यातील कानडगाव येथे 250 फूट खोल असलेल्या कूपनलिकेत सोमवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास खेळत असताना साडेतीन वर्षांचा मुलगा त्यात पडला. साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थ व प्रशासनाला यश आले. मनोज अनशाबापू घोरपडे असे त्या मुलाचे नाव आहे.
कानडगाव येथे अनशाबापू घोरपडे यांची शेती आहे. या शेतात त्यांचा 250 फूट खोलीची व सहा इंच व्यासाची कूपनलिका आहे. रविवारी दुपारी त्यांची पत्नी छाया शेतात काम करत होती. त्यादरम्यान त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा मनोज तेथेच खेळत होता. खेळता-खेळता तो कूपनलिकेत पडला. माहिती मिळताच सरपंच सोपानराव हिरगळ, ग्रामस्थ भरत घोरपडे, राधाकिसन घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी आले. दोन जेसीबींच्या साहाय्याने कूपनलिकेच्या बाजूला दुसरा आडवा खड्डा घेण्यास सुरुवात झाली. 22 फुटांचा खड्डा घेतला. मनोजला साडेपाच वाजता बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी गुहा येथील डॉ. अप्पासाहेब ढूस व त्यांच्या पथकाने कूपनलिकेत आॅक्सिजन पुरवठा केला. जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार, प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील कडासने, प्रांताधिकारी सुहास मापारी, तहसीलदार राजेंद्र वाघ व पोलिस निरीक्षक अशोक राजपूत, उपनिरीक्षक अनिल भिसे दाखल झाले. मदतकार्यासाठी साडेपाच वाजता नगर येथून लष्करातील जवानांचे एक पथकही दाखल झाले होते. मनोज कूपनलिकेत पडल्यानंतर त्याला पाहण्यासाठी या भागातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर नागरिकांनी जल्लोष केला.