पारनेर - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारत स्वाभिमान चळवळीचे नेते गोविंदाचार्य यांनी रविवारी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. लोकपालची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे व काळ्या पैशांसंबंधी कार्यवाही या तीन मुद्द्यांवर अण्णांनी नुकताच मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राळेगणसिद्धी येथे रविवारी सकाळी आल्यानंतर गोविंदाचार्य यांनी प्रथम विविध ठिकाणी भेट देऊन गावातील सर्व योजनांची माहिती घेतली. आंदोलनाचे कार्यालय, यादवबाबा मंदिर, नापासांची शाळा, मीडिया सेंटर, पद्मावती परिसर आणि पाणलोट क्षेत्र विकास इत्यादींविषयी त्यांनी माहिती घेतली. दुपारी एक वाजता गोविंदाचार्य यांची अण्णांसोबत बैठक झाली. या बैठकीत लोकपालची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण बिल, काळा पैसा आणि ग्रामविकास यासंबंधी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. देशाला खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवर न्यायचे असेल, तर स्मार्ट सिटी नव्हे, तर स्मार्ट व्हिलेज योजना राबवण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर दोघांमध्ये एकमत झाले. गांधीजींच्या मार्गानेच खरा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी फुगणारी शहरे व नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण थांबवून ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करायला हवे. केंद्र सरकारचे धोरण सामान्य माणसाच्या हिताचे दिसत नाही. त्यासाठी समविचारी लोकांशी विचारविनिमय करून देशभरात नव्याने संघटन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गोविंदाचार्य यांच्यासोबत मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बिस्ट उपस्थित होते.
युरोपातील विद्यार्थ्यांसोबत चर्चा
बैठकीनंतर अण्णा हजारे व गोविंदाचार्य या दोघांनी युरोपमधून आलेल्या ४० महाविद्यालयीन तरुणांशी प्रश्नोत्तररूपाने संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी मोदी सरकार, भारत देशासमोरील आव्हाने, भ्रष्टाचारविरोधी चळवळ, तरुणांना प्रेरणा इत्यादी मुद्द्यांवर अण्णांशी चर्चा केली.