आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'BRGF' Do Not Spend On Drainage Of Funds MP Gandhi

‘बीआरजीएफ’चा निधी गटारांवर खर्च करू नका-खासदार गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-मागास क्षेत्र अनुदान (बीआरजीएफ) निधी महापालिकेने गटारांवर खर्च न करता नाट्यगृह, तसेच उद्याने तयार करण्यासाठी वापरावा, अशी सूचना खासदार दिलीप गांधी यांनी महापालिका प्रशासनाला केली.

जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची सभा मंगळवारी जिल्हा नियोजन भवनात झाली. यावेळी गांधी यांनी सर्व योजनांचा आढावा घेत काही सूचना दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी सभेस उपस्थित होते.

खासदार गांधी यांनी महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवून विकासकामांबाबत अधिकार्‍यांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, बीआरजीएफ निधी मागासलेपण घालवून उत्पादन वाढवण्यासाठी आहे. परंतु महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून गटारांवर हा निधी खर्च करत आहे. त्याऐवजी जर शहरातील सांस्कृतिक भवन, उद्याने विकसित केली असती, तर मनपाचे उत्पन्न नक्कीच वाढले असते. मिळालेल्या निधीचे योग्य नियोजन करून त्यातून नाट्यगृहे, उद्याने तयार करा. रंगारगल्लीतील मंगल कार्यालयाची अवस्था बिकट आहे. त्याची सुधारणा करा.

एवढे मोठे शहर असून आपल्याकडे भाजी मार्केट नाही, गंजबाजारात अद्ययावत भाजी मार्केट बांधायला हवे. पण आपल्याला काहीच करायचे नाही, फक्त निधी खर्च करायचा म्हणून गटारे तयार करायची अशी टीका त्यांनी केली. अग्रवाल यांनी महापालिकेकडून पुढील वर्षाचा आराखडा आला नसल्याचे निदर्शनास आणून आराखडा तातडीने पाठवण्याच्या सूचना दिल्या. मुंगी येथील पाणी योजना पूर्ण झाली आहे, पण नागरिकांना पाणी मिळत नाही. याला तत्कालीन लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. समितीवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी सूचना गांधी यांनी अधिकार्‍यांना केली.