आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर-सोलापूर मार्गावर पूल खचल्याने वाहतूक ठप्पच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते उखडले आहे. पावसामुळे दक्षिणेकडे जोडणाऱ्या नगर-सोलापूर रस्त्याचा बोजवारा उडाला आहे. नगर-सोलापूर रस्त्यांवरील घोगरगाव जवळील रस्ता खचल्याने शुक्रवारी वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला अाहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत प्रथमच १३८ टक्के पाऊस झाला अाहे. जिल्ह्यातील सहा धरणे शंभर टक्के भरली आहेत. 
 
गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पाच वर्षांत जिल्ह्यात प्रथमच पावसाने सरासरी आेलांडली आहे. नगर जिल्ह्याची ४९७ मिलिमीटर पावसाची सरासरी आहे. यंदा ६८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव वगळता अन्य बारा तालुक्यांत १२० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले नगर-मनमाड महामार्ग, नगर- आैरंगाबाद महामार्ग, नगर-कल्याण महामार्ग नगर-सोलापूर रस्त्यांची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. 

नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही तीच अवस्था झाली आहे. प्रमुख महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते देखील खचले आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहे. दक्षिण भारताला जोडणारा नगर-सोलापूर हा प्रमुख रस्ता आहे. दक्षिण भारतातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डी शिंगणापूरला येत असतात. मात्र, पावसामुळे हा रस्ता खराब झाल्याने दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नगर-सोलापूर रस्त्यांवरील घोगरगाव जवळील पुलाला तडा गेल्याने तो पूल वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. दोन ते तीन किलोमीटर वाहनांचा रांगा लागल्या अाहेत. नगर-सोलापूर रस्ता निमगाव डाकूपर्यंत खराब आहे. नगर ते मिरजगाव रस्त्यावर खड्डे आहेत. विशेष म्हणजे घोगरगाव ते नगर हे अंतर ४५ किलो मीटर अंतर अाहे. चांगला रस्ता असताना तासाभरात नगरला येणे शक्य होत असे. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. तीच अवस्था अन्य रस्त्यांची देखील झाली आहे. नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर देखील पावसामुळे खड्डे पडल्याने वाहतूक धिम्या गतीने होत आहे. 
 
अतिवृष्टीचे जिल्ह्यात होणार पंचनामे 
जिल्ह्यातीलगेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या वीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, कृषी विभाग महसूल विभागाने पिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम हाती घेतले असून, तीन दिवसांत नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...