आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यास हिसका दाखवू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्वातंत्र्यदिनी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. शिवाजी महाराजांची बदनामी करणारे लिखाण करणाऱ्या पुरंदरे यांना सरकारने पुरस्कार देऊन पाहावा त्यांनी तो स्वीकारून दाखवावा. त्यानंतर संभाजी ब्रिगेड आपला हिसका दाखवेल, असा इशारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिला.
सोमवारी (२१ जून) माऊली सभागृहात होणाऱ्या ब्रिगेडच्या अधिवेशन शिवसन्मान जागर परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या अधिवेशनातून ब्रिगेडची निर्णायक भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
"शेतकऱ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात' हे ब्रिद घेऊन ब्रिगेड कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रभान ठुबे, अण्णासाहेब सावंत, जिल्हा सचिव दत्ता साठे, शहर कार्याध्यक्ष गणेश गायकवाड, विजय खेडकर, लक्ष्मण खोडदे, पोपटराव चेमटे, संतोष कोकाटे, अच्युत गाडे आदी उपस्थित होते. परकाळे म्हणाले, पुरदंरे यांनी त्यांच्या पुस्तकातून शिवाजी महाराज जिजाऊंची बदनामी करणारे लिखाण केले आहे. बहुजन समाजाविषयी अवमानकारक अपशब्द वापरणारे लिखाण त्यांच्याकडून झाल्याचे अनेक पुरावे सरकारकडे देऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊ नये, अशी विनंती करण्यात आली. मात्र, सरकारने आपला हेका कायम ठेवत पुरदंरे यांना पुरस्कार जाहीर केला. विकृत, खोटा समाजात तेढ वाढवणारा इतिहास सांगणाऱ्या पुरंदरे यांना सरकारने पुरस्कार देऊन पाहावा त्यांनी तो स्वीकारून दाखवावा.
त्यानंतर ब्रिगेड आपला हिसका दाखवेल, असा इशारा परकाळे यांनी दिला. शासनाने सध्या शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केली आहे. दूध ऊस उत्पादकांना जाणिवपूर्वक अडचणीत आणले जात आहे. शहरी मतदार खुष ठेवण्यासाठी शेतकरी देशोधडीला लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. धानपिके, ऊस, कापूस, सोयाबीन, दूध, जनावरांच्या संगोपनाचे अनुदान, शेतीला मोफत वीज, पिण्याचे शेतीसाठी मुबलक पाणी या सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ब्रिगेडचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याचे परकाळे यांनी सांगितले. ब्रिगेडच्या अधिवेशन शिवसन्मान जागर परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...