आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळात भारतीय खेळाडूंना अतिशय चांगले भवितव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारतीय खेळाडू अतिशय समर्पण भावनेने बुद्धिबळ खेळतात. ते खेळाबाबत गंभीर आहेत. शिवाय त्यांचे या खेळाबाबत व्यावहारिक चातुर्यही जबरदस्त आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर या खेळात भारतीय खेळाडूंना खूप चांगले भवितव्य आहे, असे मत युक्रेनचा बुद्धिबळ खेळाडू अलेक्सांद्र गोलेश्चेकोव्ह याने मंगळवारी व्यक्त केले.

अलेक्सांद्र नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध खेळाडू शार्दुल गागरे याला मार्गदर्शन करण्यासाठी नगरला आला आहे. अतिजलद स्पर्धेत सात ग्रँडमास्टर खेळाडूंना शार्दुलने हरवले. त्याचा खेळ पाहून अलेक्सांद्र अतिशय प्रभावीत झाला. त्यानेच स्वत:हून शार्दूलला मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार तो नगरमध्ये आला आहे. शार्दुलला मार्गदर्शन हे निमित्त आहे. इतर खेळाडूंनाही त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने अलेक्सांद्र नगरच्या अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. त्यानिमित्ताने नगरच्या पत्रकारांशी संवाद साधताना तो बोलत होता.
अलेक्सांद्र म्हणाला, शार्दुलकडून मला मोठ्या अपेक्षा आहेत. नगरमधून पहिला ग्रँडमास्टर घडवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्याने नमूद केले. ‘ग्रँडमास्टर’पासून तो खूप जवळ आहे. फक्त वेळेचा प्रश्न आहे, असेही त्याने नमूद केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळात संगणकामुळे खूप बदल झाले आहेत. मी बुद्धिबळ पुस्तकांतून शिकलो. आताची पिढी संगणकाद्वारे शिकत आहे. मात्र, या खेळाडूंनीही पुस्तकांचा वापर करणे आवश्यक आहे. पण त्याच बरोबर पुस्तकांबरोबरच स्वत:ची बुद्धी वापरणेही महत्त्वाचे आहे. भारतातील युवा बुद्धिबळ खेळाडूंची पिढी अतिशय आश्वासक आहे. आज अनेक भारतीय खेळाडू रशियन मार्गदर्शकांकडून खेळाचे धडे गिरवत आहेत.

काळानुसार हा खेळही वेगवान होत आहे, असे सांगून तो म्हणाला, की या खेळात वेग वाढल्याने तो लोकप्रिय होत आहे. त्याकडे प्रेक्षक आकर्षित होत आहेत. अर्थात पूर्वीच्या क्लासिक खेळाला मात्र पर्याय नाही.

बुद्धिबळ हा मानसशास्त्रीय व गुंतागुंतीची प्रक्रिया असलेला खेळ आहे. त्याने स्मरण व समजशक्ती वाढते. या खेळावर प्रेम करा. या खेळाची तत्त्वे व प्रात्यक्षिक यांचा योग्य समन्वय ठेवून खेळावर प्रभुत्व मिळवण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करा, असा संदेश त्याने दिला. यावेळी उद्योजक नरेद्र फिरोदिया, बुद्धिबळपटू शार्दूल गागरे, त्याचे वडील डॉ. अण्णासाहेब गागरे व बुद्धिबळ खेळाडू उपस्थित होते.

योगाभ्यासाचा लाभ
बुद्धिबळ खेळणाऱ्यांना योगाभ्यासाचा चांगला लाभ होत असल्याचा अनुभव अलेक्सांद्र याने यावेळी सांगितला. योग केल्याने मनात येणारे येणाऱ्या नकारात्मक विचारांना बाहेर काढून टाकण्यात मोठी मदत होते. त्याचा फायदा खेळताना होतो. त्यामुळे तो स्वत: नियमित योगाचा अभ्यास करत असल्याचे त्याने सांगितले. योगाबरोबरच शुद्ध शाकाहारी भोजनाचेही त्याने समर्थन केले.
छायाचित्र: युक्रेनचा बुद्धिबळ खेळाडू अलेक्सांद्र गोलेश्चेकोव्ह नगरचा प्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू शार्दुल गागरे यांच्यात रंगलेला डाव. समवेत उद्योजक नरेंद्र फिरोदिया.