आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक सारडांच्याच नेतृत्वाखाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगामी महापालिका निवडणूक शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. पक्षाच्या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांसमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत सुरु असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र कार्यालयावरुन जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व शहर जिल्हाध्यक्ष सारडा यांच्यात वाद निर्माण झाला होता. सारडा यांनी या वादावर थेट राजीनामा अस्त्र बाहेर काढले. नंतर वाद शमल्याचे पत्रक जिल्हा काँग्रेसकडून काढण्यात आले. मात्र, सारडा यांनी माघार घेतली नाही. आगामी मनपा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायच्या, हे या वादामागील प्रमुख कारण होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत बैठक घेतली. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सारडा व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. महापालिका निवडणूक सारडा यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. निवडणुकीसाठी संसदीय समिती तयार करण्यात येणार असून या समितीची सूत्रे सारडा यांच्याकडे ठेवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील दोन्ही मंत्री व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत 21 सप्टेंबरला शहर काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याच दिवशी संसदीय समितीची पहिली बैठक होईल. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबतचे सर्वाधिकार या समितीला देण्यात आले आहेत.