आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात दगड घालून भावाचा खून, पैशाच्‍या वाटणीवरुन झाला होता वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- नाशिक-पुणेराष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या वाटणीवरुन दोन भाऊ आणि आईमध्ये जोरदार वाद झाला. या वादाची परिणती थेट भावाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात झाली.
ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तळपेवाडी (बोटा) येथे सोमवारी रात्री घडली. खुनाच्या या घटनेत दुसऱ्या मुलाला मातेनेच साथ दिल्याचे समोर आल्याने माय-लेकाविरोधात पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी माय-लेकास अटक झाली आहे. दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

श्रीरंग ऊर्फ नारायण पाटीलबा तळपे (२८, तळपेवाडी, संगमनेर) असे मृताचे नाव आहे. भाऊसाहेब पाटीलबा तळपे (४०, तळपेवाडी, संगमनेर) आणि त्याची आई वेणुबाई (६५ वर्षे) अशी आरोपी माय-लेकाची नावे आहेत. तळपे कुटुंबीयांच्या सामूहिक मालकीची जमीन नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केली आहे. संपादित केलेल्या या जमिनीचा मोबदला म्हणून त्यांना सुमारे ५० ते ६० लाख रुपये मिळणार आहेत. याच पैशांच्या कारणावरुन गेल्या काही दिवसांपासून श्रीरंगचा आई आणि मोठ्या भावाशी वाद सुरू होता.
तिघेही सोमवारी रात्री घरासमोर बसले असता या विषयावरुन पुन्हा त्यांच्यात चर्चा सुरु झाली. मिळणारे सर्वच्या सर्व पैसे मलाच मिळावे यावरुन श्रीरंगने वाद उकरुन काढला. त्यातून दोघा भावांत आणि आईत निर्माण झालेला वाद हातघाईवर पोहोचला. त्याची परिणती मारामारीत झाली. त्यामुळे संतप्त भाऊसाहेबने श्रीरंगला दगडाने ठेचून मारले. आईनेच श्रीरंगचे पाय पकडून भाऊसाहेबला साथ दिल्याने श्रीरंगचा प्रतिकार कमी पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी पोलिस निरीक्षक अनिल नलावडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर नलावडे घटनास्थळी आले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेत अटक केली. घारगाव पोलिस ठाण्यात यासंदर्भात आरोपी मायलेकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्याबाबत उपाययोजना आखण्याची मागणी नागरिक करत आहेत.