आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"कनेक्टींग इंडिया' म्हणत "उडान' घेण्यासाठी बीएसएनएलची धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "कनेक्टींग इंडिया' हे घोषवाक्य असलेल्या भारत संचार निगमला (बीएसएनएल) दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणि तोट्याचे गणित सांभाळताना होणारी कसरत लक्षात घेता अखेर ग्राहकांचे महत्त्व समजले आहे. त्यामुळेच पंतप्रधान जन-धन योजनेच्या खातेदारांना मोफत सीमकार्ड (प्री-पेड) देण्याची योजना निगमने आणली आहे. या योजनेद्वारे "कनेक्टींग पिपल' म्हणत पुन्हा एकदा "उडान' घेण्यासाठी बीएसएनएलने धडपड सुरू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब लोकांच्या हितासाठी "पंतप्रधान जन-धन योजना' घोषित केली. ज्यांचे अद्याप बँकेत खाते नाही, अशांना बँकेशी जोडण्याची ही योजना आहे. देशातील एकही कुटुंब बँक खात्याविना राहू नये आणि गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करून आर्थिक विकासावर भर देण्याचा जन-धन योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडण्यात येत आहेत.

सरकारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या बीएसएनएलला सध्या खासगी दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच संथ कारभारामुळे तोटावाढतो आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आणि ग्राहकाभिमुख होण्यासाठी बीएसएनएलने "उडान' घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच जन-धन योजनेच्या खातेदारांना मोफत सीमकार्ड देण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे. देशातील नागरिकांना उच्च गुणवत्तेची सुविधा आणि स्वस्त व सुलभ माहिती मिळावी, तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून बीएसएनएलने ही योजना सुरू केली आहे, असे केंद्र निदेशक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.

योजनेचा प्रचार, प्रसाराची गरज
ग्राहक सेवेबाबत नेहमीच तक्रारी असलेल्या बीएसएसएनएलने या योजनेच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील तळागाळात पोहोचता यावे, हा हेतू ठेवून ग्राहकांच्या दारापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या योजनेचा प्रचार, प्रसार करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकेत बीएसएनएलने कर्मचारी ठेवावेत. जन-धन योजनेच्या खातेदारांना या योजनेची माहिती द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

योजना नव्वद दिवसांसाठीच
जिल्ह्यात ही योजना ८ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ९० दिवसांपर्यंत म्हणजे ६ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. या योजनेमुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे. या योजनेला प्रतिसाद मिळाल्यास योजनेच्या कालावधी वाढू शकतो.''
डी. एस. ठुबे, विपणन अभियंता, बीएसएनएल.

राष्ट्रीयकृत बँकेतच असावे खाते
हे मोफत सीमकार्ड घेण्यासाठी जन-धन योजनेचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेतच असणे गरजेचे आहे. खातेदारांनी त्यांच्या पासबुकची झेरॉक्स व फोटो बीएसएनएलच्या कार्यालयात द्यावे. त्यानंतर सीमकार्ड मिळेल. हे सीमकार्ड प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बीएसएनएल कार्यालयात व ग्राहक सेवा केंद्रात उपलब्ध आहेत.