आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSNL News In Marathi, Agriculture Simcard Issue At Nagar, Divya Marathi

बीएसएनएलचे ‘महाकृषी-3’ सिमकार्ड घेताना शेतक-याची पिळवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ‘जिल्ह्यात शेतकरी पुन्हा बोलणार मोफत’, असा गाजावाजा करत भारत संचार निगमने (बीएसएनएल) शेतकर्‍यांसाठी ‘महाकृषी-3’ योजना आणली. मात्र, या योजनेचे सिमकार्ड घेताना‘बीएसएनएल’कडून शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. विविध कागदपत्रांची मागणी, फोटो ओळखपत्र, कर्मचार्‍यांचे असहकार्याचे धोरण आणि र्मयादित वेळ यामुळे शेतकर्‍यांना या कृषिकार्डसाठी दोन-तीन दिवस हेलपाटे मारावे लागतात.
‘बीएसएनएल’च्या या कृषिकार्ड योजनेच्या पहिल्या व दुसर्‍या योजनेला शेतकर्‍यांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्या प्रतिसादाच्या जोरावरच आता ‘महाकृषी - 3’ ही योजना गाजावाजा करत सुरू झाली. शेतकरी असल्याचा सात-बारा उतारा, तालुका कृषी अधिकार्‍यांचा दाखला यासह अर्ज केल्यानंतर 20 रुपये भरून कृषिकार्ड शेतकर्‍यांना देण्यात येते. मात्र, ‘बीएसएनएल’मध्ये सिमकार्ड घेण्यासाठी शेतकर्‍यांना चकरा माराव्या लागत आहेत.
या योजनेचे अर्ज इंग्रजीत असल्याने शेतकर्‍यांना माहिती भरणे शक्य होत नाही. अर्ज संपूर्ण भरलाच पाहिजे, अशी संबंधित कर्मचार्‍याची अपेक्षा असते. त्यामुळे किरकोळ कारणांवरून अर्ज नामंजूर होत आहेत. तसेच अर्जात नक्की उणीव काय? व उणीव कशी दूर करता येईल हे सांगण्याची तसदी कर्मचारी घेत नाहीत. अनेक शेतकरी वृद्ध आहेत, काही महिला आहेत. त्यांना प्रत्यक्ष येणे शक्य होत नाही. आले तरी एका दिवसात कार्ड मिळेल याची शाश्वती नाही. असे असतानाही ती व्यक्ती प्रत्यक्षच हवी असा आग्रह बीएसएनएल कर्मचार्‍यांकडून धरला जातो. फोटो ओळखपत्रावरून तर अनेकांना माघारी पाठवण्यात येत आहे. मतदान कार्ड किंवा आधार कार्डावरील फोटो गडद असल्याने त्यांच्या झेरॉक्स काळपट येतात.
मूळ ओळखपत्र दाखवूनही अर्ज स्वीकारले जात नाहीत. अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी दीड आहे. रांग असतानाही दीड वाजता खिडकी बंद करून, उद्या या असे सांगितले जाते. या किचकट कारभारामुळे कृषिकार्डच नको, असे म्हणण्याची वेळ आता शेतकर्‍यांवर आली आहे.
कागदपत्रे ‘ट्राय’ च्या नियमानुसारच
यापूर्वीच्या कृषिकार्ड योजनेचे सिमकार्डाचे वाटप करताना असे नियम का वापरले नाहीत? हे माहिती नाही. या वेळी मात्र आम्ही सर्व कागदपत्रे ‘ट्राय’ च्या नियमानुसार पाहूनच घेत आहोत. ओळखपत्र स्पष्ट, अर्ज पूर्ण भरलेला असावा, व्यक्ती प्रत्यक्ष हवी असे आदेशच आहेत. त्यानुसारच कार्यवाही होत आहे.’’ आर.एम. केदार, बीएसएनएल, नगर.
कार्ड न घेतलेलेच बरे
पहिल्या दिवशी अपूर्ण माहितीमुळे, तर दुसर्‍या दिवशी वेळेअभावी माघारी यावे लागले. सीमसाठी 5 दिवस जात असतील, तर ते कार्ड न घेतलेलेच बरे. ’’ गोवर्धन रोकडे, नागरिक.
आमची चूक काय?
व्यक्ती प्रत्यक्षच आली पाहिजे असा आग्रह धरतात. व्यक्ती प्रत्यक्ष आणली, तर ओळखपत्राच्या झेरॉक्सवरील फोटो स्पष्ट नाही म्हणून परत जावे लागले. तिसर्‍या दिवशी मूळ मतदान ओळखपत्र, आधार कार्ड दाखवले तरी झेरॉक्स अस्पष्टचे कारण दिले. वरिष्ठ अधिकारीही व्यवस्थित बोलत नाहीत. आधार कार्ड आम्ही घरी तयार केले आहे का ? झेरॉक्स अस्पष्ट येते यात आमची काय चूक?’’ शिवकुमार निकम, नागरिक.