आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएलची महाकृषी-3 योजना पुन्हा कार्यान्वित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर / संगमनेर - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभाग यांच्या समन्वयाने व जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या वाढत्या मागणीमुळे जिल्ह्यात बीएसएनएलने ‘महाकृषी 3’ ही योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकमेकांशी फ्री बोलतील.


बीएसएनएल व महाराष्ट्र शासनातर्फे या योजनेला जिल्ह्यात रविवारपासून (9 फेब्रुवारी) सुरुवात झाल्याची माहिती उपमंडल अभियंता ज्ञानदेव गायकर यांनी दिली. बीएसएनएलतर्फे मोबाइल ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेली कृषी योजना बंद होती. त्यामुळे नव्याने कृषी योजनेशी जोडले जाणार्‍या शेतकर्‍यांमध्ये नाराजीची भावना होती. कृषी योजनेचे या आधी दोन टप्पे झाले असून या दोन्ही टप्प्यात या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला होता. महाकृषी 1 व 2 या नावाने सुरू झालेल्या या योजना बीएसएनएलने प्रभावीपणे अमलात आणली होती. त्याची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली होती. रविवारपासून महाकृषी 3 च्या योजनेला सुरुवात झाली असून यालाही शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा आशावाद गायकर यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य कृषी मंत्रालय आणि भारत संचारच्या निगम लिमिटेडच्या वतीने योजना सुरू करण्यात आली असली, तरी या योजनेची मुदत सहा महिन्यांसाठीच आहे. योजनेंतर्गत अवघ्या वीस रुपयांत सीमकार्ड मिळणार आहे. 108 रुपयांचे रिचार्ज यासाठी दरमहा आवश्यक आहे. याशिवाय अन्य सुविधादेखील या योजनेत समाविष्ट असल्याची माहिती बीएसएनएलच्या सूत्राकडून मिळाली.


सीमकार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
प्रत्येक शेतकर्‍यास या योजनेअंतर्गत तीन सीमकार्ड दिले जातील. महिनाभराच्या कालावधीतील सातबारा आवश्यक. कृषी विभागाचा नमुन्यातील दाखला आवश्यक. रहिवासी पुरावा व रंगीत फोटो, तसेच कृषी अधिकार्‍याचा दाखला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.


हे आहेत महाकृषी सीमचे फायदे
0100 मिनिटे इतर नेटवर्कशी व 300 मिनिटे बीएसएनएलशी, अशी 400 मिनिटे मोफत.
0200 बीएसएनएल व 100 इतर नेटवर्कसाठी एसएमएस.
0200 एमबी इंटरनेट डाटा दरमहा.
0थ्रीजीमध्ये मोफत रूपांतर करता येईल.
0सहा व बारा महिन्यांसाठी एकदाच रिचार्जची सोय.


शेतकर्‍यांकडून प्रतिसाद मिळेल
शेतात उभे राहून सहकारी शेतकर्‍यांशी चर्चा करून, पिकांचे नियोजन व इतर कामे करताना योजनेतील मोफत संभाषणाचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सुमारे एक लाख 45 हजार शेतकर्‍यांनी हे कार्ड घेतले होते. या वेळी शेतकर्‍यांकडून मोठा प्रतिसाद मिळेल. डी. एस. ठुबे, विपणन अभियंता, बीएसएनएल.