आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेची माणिकदौंडी शाखा फोडली; सव्वातीन लाख लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा फोडून चोरट्यांनी 3 लाख 30 हजार रुपये लांबवले. ही घटना शनिवारी (2 नोव्हेंबर) रात्री घडली. पंधरा दिवसांपूर्वी याच पद्धतीने चोरट्यांनी चिंचपूर इजदे येथील शाखा फोडून साडेपंधरा लाख रुपये लांबवले होते.

शनिवारी दुपारी चार वाजता नेहमीचे कामकाज आटोपल्यानंतर कर्मचार्‍यांनी शाखा बंद केली होती. मध्यरात्री चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून बँकेत प्रवेश केला. नंतर सायरनची वायर कापून गॅसकटरच्या साहाय्याने भिंतीमधील तिजोरीचा दरवाजा कापून आतील रोकड त्यांनी लांबवली. रविवारी सकाळी चोरी झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती शाखाधिकारी भारत काशीद व पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक अशोक आमले यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, उपयोग झाला नाही. ग्रामीणचे उपअधीक्षक गणेश राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. शाखाधिकारी काशीद यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीच्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. चिंचपूर इजदे व माणिकदौंडी या दोन्ही शाखा फोडण्याची चोरट्यांची पद्धत एकच आहे.

गुप्तचर विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष
ग्रामीण भागातील बँकांमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, तसेच सीसीटीव्ही व सायरन बसवावेत असा अहवाल दोन महिन्यांपूर्वी गुप्तचर विभागाने दिला होता. मात्र, त्याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही. माणिकदौंडीत स्वतंत्र पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी पोलिस पाटील शिवाजी मोहिते यांनी केली.