आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीमुळे बु-हाणनगरसह दोन पाणी योजना झाल्या बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषदेमार्फत चालवण्यात येणार्‍या पाच प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना चालवल्या जात आहेत. या योजनांचे वीज बिल व पाणीपट्टी भरण्यासाठी निधी नोव्हेंबर महिन्यातच खर्च झाला आहे. त्यामुळे वीज बिलाच्या थकबाकीअभावी बु-हाणनगरसह व मिरी-तिसगाव योजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला असून या योजना बंद पडल्या आहेत.

जिल्हा परिषदेने काही दिवस योजना चालवल्यानंतर स्थानिक समितीकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. पण स्थानिक पातळीहून योजना ताब्यात घेतली जात नसल्याने नाइलाजास्तव जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेल्या शेवगाव-पाथर्डी ही 54 गावे, बु-हाणनगर (45 गावे), मिरी तिसगाव (22 गावे) यासह पाच योजना चालवाव्या लागत होत्या. या योजना चालवण्यासाठी वीज बिल व पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी भरावी लागते. त्यासाठी जिल्हा परिषदेने सुमारे साडेचार कोटींची तरतूद केली होती. वेळोवेळी विविध बिलांचा भरणा केल्याने हा निधी 16 नोव्हेंबरला खर्च झाला. सध्या बु-हाणनगर योजनेवर 36 कोटी 6 लाख तर मिरी-तिसगाव योजनेवर 1 कोटी 73 लाखांची थकबाकी आहे. त्यातच वीज बिले भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे निधी उरला नाही. यापार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी बु-हाणनगर, मिरी-तिसगाव या योजनांचा वीजपुरवठा थकबाकीअभावी खंडित केल्याने या योजना बंद केल्या आहेत.

‘त्या‘ कराराचा झेडपीला पडला विसर
जिल्हा परिषदेने शेवगाव-पाथर्डी योजना हस्तांतरित करताना पाथर्डी नगर परिषदेबरोबर 2001 मध्ये करार केला होता. त्यानुसार नगर परिषदेला दिल्या जाणार्‍या शासकीय अनुदानातून थकबाकीची रक्कम कपात करणे शक्य आहे. या कराराची अंमलबजावणी झाल्यास ही योजना सुरळीत सुरू राहू शकते. पण, गेल्या दहा वर्षांत या कराराचा विसरच जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे.