आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुरूडगावला ३ वर्षांनंतर पाणी, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेचा कचरा डेपो व सीना नदीच्या दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या बुरूडगावच्या ग्रामस्थांना तब्बल तीन वर्षांनंतर महापालिकेतर्फे स्वच्छ पाणी मिळणार आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांकडे असलेली सुमारे १२ लाखांची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी सभेत केली. हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला, तरी आता हक्काचे पाणी मिळणार असल्याने बुरूडगावच्या ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुरूडगावचा १९९९ च्या हद्दवाढीत नगरपालिकेत समावेश झाला. त्यानंतर सन २००३ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. बुरूडगाव येथून नगरसेवकही निवडून आले. त्यानंतर १६ जून २००४ मध्ये गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. तत्कालीन आयुक्त सानप यांच्या हस्ते बुरूडगावला महापालिकेच्या माध्यमातून मुळा धरणाचे पाणी सुरू करण्यात आले. परंतु हे समाधान बुरूडगावच्या ग्रामस्थांना जास्त दिवस मिळाले नाही. ग्रामस्थांच्या मागणीनुसार १६ जून २०११ रोजी बुरूडगाव पुन्हा महापालिका हद्दीतून वगळण्यात आले. तेव्हापासून येथील ग्रामस्थांसमोर पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. २००३ पूर्वी बुरूडगावला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विहिरीचे पाणी मिळत होते. मात्र, मागील दहा-बारा वर्षांपासून शहरातील सर्व सांडपाणी सीना नदीत सोडण्यात येत असल्याने विहिरीचे पाणीदेखील दूषित झाले आहे. मागील तीन-चार वर्षांत, तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थ महापालिकेकडे वारंवार पिण्याच्या पाण्याची मागणी करत होते. आयुक्त विजय कुलकर्णी यांनी ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला. नगरसेवक गणेश भोसले, अनिल शिंदे, कैलास गिरवले, सचिन जाधव यांच्यासह सर्वांनीच बुरूडगावला पाणी देण्याचा आग्रह धरला. महापौर संग्राम जगताप यांनी पाणी देण्याचा विषय मंजूर केला. थकीत पाणीपट्टीबाबत शासनाचे मार्गदर्शन मागवून निर्णय घेण्यात येणार आहे.
एक दिवसाआड मिळणार पाणी
बुरूडगावमध्ये १२६ नळजोड असून त्यांच्याकडे सुमारे १२ लाख रुपये थकीत आहेत. ही रक्कम माफ करण्याचा निर्णय झाला नाही, तर ती टप्प्याटप्प्याने वसूल करण्यात येणार आहे. शहराप्रमाणेच बुरूडगावला एक दिवसाआड पाणी देण्यात येणार आहे. पाणी सोडण्याची कार्यवाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने लवकरच पूर्ण होणार आहे.