आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार्‍याची फसवणूक करणार्‍या दोघांना कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - येथील व्यापार्‍याची फसवणूक करणार्‍या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. ए. गायकवाड यांनी 15 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या फसवणुकीच्या या घटनेत गुजरात पोलिस दलातील एका कर्मचार्‍याचा समावेश आहे.

महावीरसिंग नरमसिंग पुजारी (भरतपूर, राजस्तान) व विजय चैत्राम सोनवणे (सुरत, गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत. सन 2010 मध्ये नगर येथील फळांचे व्यापारी सिकंदर बागवान यांनी गुजरातमधील नवसारी येथून पाच लाख रुपयांचे आंबे मागवले होते. माल पोहोच झाल्यानंतर त्यांनी ट्रकचालक पुजारीकडे पाच लाख रुपये दिले. आंबे पाठवणारे नवसारीचे व्यापारी जाफर पठाण यांच्याकडे ही रक्कम पोहोच करण्याऐवजी पुजारी हा ट्रक चांदवडला सोडून रक्कम घेऊन पसार झाला. त्यावेळी कोतवाली पोलिस ठाण्यात ट्रकमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोतवालीचे कर्मचारी ए. पी. भोसले, सुनील चव्हाण व प्रसाद साळवे यांनी पुजारीला तब्बल तीन वर्षांनंतर राजस्थानमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक बाब पुढे आली.

चांदवडला ट्रक सोडून पुजारी सुरतला पळाला. तेथील बालाजी सोसायटीत एका महिलेला तो भेटायला गेला. सोसायटीतील लोकांनी त्याला पकडून सुरत येथील पोलिस कर्मचारी विजय सोनवणे याच्या ताब्यात दिले. सोनवणे याने चौकशी करून कारवाई करण्याऐवजी पुजारीजवळ असलेल्या पाच लाखांपैकी दोन लाख रुपये घेऊन त्याला सोडून दिले. या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी सोनवणेलाही अटक केली. या दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली.