आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर; 3200 व्यापार्‍यांकडून अखेर विवरणपत्रे सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मुदतवाढ दिल्यानंतर 3200 व्यापार्‍यांनी स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) सहामाही विवरणपत्र महापालिका प्रशासनाला सादर केले. प्रशासन आता या विवरणपत्रांची पडताळणी करणार आहे. विवरणपत्र सादर न करणार्‍या उर्वरित व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

1 जुलै 2012 पासून लागू करण्यात आलेल्या एलबीटीच्या माध्यमातून मनपाला मागील सहा महिन्यांत केवळ 12 कोटी 81 लाखांचे उत्पन्न मिळाले. एलबीटीला सहा महिने झाल्याने विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने व्यापार्‍यांना केले होते. मात्र, व्यापार्‍यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. तथापि, केवळ 3 हजार 200 व्यापार्‍यांनीच विवरणपत्र सादर केले आहे. विवरणपत्र सादर करणार्‍यांपैकी किती व्यापार्‍यांनी एलबीटी भरला, सादर करण्यात आलेली विवरणपत्रे खरे की खोटी, याची पडताळणी आता प्रशासन करणार आहे. विवरणपत्र सादर न करणार्‍या उर्वरित 3 हजार 600 व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. एलबीटीसाठी शहरातील 6 हजार 800 व्यापार्‍यांची नोंदणी करण्यात आली असली, तरी आतापर्यंत केवळ दोन ते अडीच हजार व्यापार्‍यांनीच एलबीटी भरला आहे. उर्वरित व्यापार्‍यांनी मात्र सहा महिने उलटूनही एलबीटी भरलेला नाही. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत अजूनही अपेक्षित एलबीटी जमा झालेला नाही. एलबीटीपूर्वी जकात व पारगमनच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे साडेसात कोटींचे उत्पन्न मनपाला मिळत होते. आता मात्र एलबीटी व पारगमनच्या माध्यमातून केवळ 4 ते 5 कोटींचे उत्पन्न मिळते आहे. पूर्वीची जकात आणि आताच्या पारगमन व एलबीटीच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी 31 जानेवारीला झालेल्या सभेत सांगितले. मात्र, व्यापार्‍यांनी सुरुवातीपासून एलबीटीबाबत उदासीन भूमिका घेतल्याने प्रशासनाचे प्रयत्न कितपत यशस्वी होणार, याबाबत शंकाच आहे.