आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • By Pass Road Not Started Issue At Nagar, Divya Marathi

बाह्यवळण रस्ता केवळ फलकापुरता..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला बाह्यवळण रस्ता केवळ फलक लावण्यापुरताच उरला आहे. बाह्यवळण रस्ता खुला होऊन सुमारे तीन महिने लोटले, तरी अजून शहरातूनच अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे. अवजड वाहनचालकांच्या या शॉर्टकटमुळे अनेकांचे बळी जात असताना पोलिस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहेत.
वाढत्या लोकसंख्येबरोबर नगर शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. वाढलेल्या वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडत आहेत. वर्षानुवर्षे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्याने नगरकरांना दररोजच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नगरकरांचे दररोज लाखो रुपयांचे इंधन वाया जाते.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी सन 2007-08 मध्ये बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. तब्बल सहा वर्षे हे काम चालले. 1 फेब्रुवारीला बाह्यवळण रस्त्याची प्रतीक्षा संपली. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बाह्यवळण रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतुकीवर पडणारा 50 टक्के ताण कमी होणार होता. त्याचबरोबर इंधनाच्या वापरातही बचत होऊन शहरातून जाणार्‍या अवजड वाहनांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषणही कमी होणार होते. पुणे, कल्याण, मनमाड, तसेच औरंगाबादकडे जाणारी अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने जाणे अपेक्षित होते. मात्र, पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहने बाह्यवळण रस्त्याने न जाता शहरातील जुन्याच रस्त्यावरून जातात.

बाह्यवळण रस्त्यावरून जड वाहतूक वळवण्यासाठी प्रशासनाला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी घाईघाईत या रस्त्याचे उद्घाटन केले. मात्र, वाहतूक वळवण्यात आली नाही. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तो पोलिस प्रशासनाकडे सुपूर्द केला. सार्वजनिक बांधकामने औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी व पुणे रस्त्यावर बाह्यवळण रस्त्याचे फलक लावले आहेत. मात्र, वाहनचालक या फलकांकडे दुर्लक्ष करत जुन्याच रस्त्याने वाहने नेतात.

बाह्यवळण रस्त्याचे काम अनेक वर्षे निंबळकच्या रेल्वे उड्डाणपुलाअभावी रखडले होते. या उड्डाणपुलासाठी 14 कोटी व भराव रस्त्यासाठी 9 कोटी असा 23 कोटी रुपये खर्च झाला. हा सर्व खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून करण्यात आला. दुरुस्तीसाठी आणखी साडेतीन कोटींची मागणी करण्यात आली आहे. हा रस्ता खुला झाल्यावर शहरातून जाणार्‍या जड वाहतुकीचा त्रास कमी होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.
अजून किती बळी घेणार?
औरंगाबाद व पुण्याकडून येणारी अवजड वाहने नगर शहरातून जातात. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे चांदणी चौक, डीएसपी चौक, औरंगाबाद नाका, कोठला स्टँड, जीपीओ चौक, कोठी चौक, इम्पिरियल चौक, स्वस्तिक चौक, सक्कर चौक, कायनेटिक चौक या भागात छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाह्यवळण रस्ता सुरू केला खरा, पण वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहतूक या रस्त्यावरून जाण्याऐवजी शहरातूनच जात आहे. पोलिस प्रशासन अजून किती बळी घेणार, असा सवाल विचारला जात आहे.
वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ कमी
शहर वाहतूक पोलिस शाखेकडे मनुष्यबळ कमी आहे. अवघ्या 32 पोलिसांवर सर्व शहरातील वाहतुकीच्या नियंत्रणाची जबाबदारी आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाहतुकीवर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी आम्हाला धावपळ करावी लागते. त्यातच पोलिसांच्या सुट्या असल्यास मोठी कसरत करावी लागते. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. ’’ एस. बी. पाडळकर, पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा.