आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्याला कॅबिनेट?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम शिंदे. - Divya Marathi
राम शिंदे.
नगर- राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात नगरला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता अाहे. पालकमंत्री राम शिंदे यांना कृषिमंत्रिपद दिले जाईल, असे समजले. विस्तारात मित्रपक्षांबरोबर भाजपच्या केवळ सहा-सात आमदारांची वर्णी लागणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात नगर जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्रिपदे होती. आघाडीच्या काळात काँग्रेसचे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, तर राहाता विधनसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे कृषिमंत्रिपद होते. अकोले मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार मधुकर पिचड यांच्याकडे आदिवासी विकास खाते होते. ही तिन्ही मंत्रिपदे कॅबिनेट दर्जाची होती.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगरला मंत्रिपदच मिळाले नाही. नंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कर्जत-जामखेडचे आमदार राम शिंदे यांना गृहराज्यमंत्रिपदासह अन्य खाती पालकमंत्री पद देण्यात आले. आघाडीच्या काळात तीन कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे असणाऱ्या नगर जिल्ह्याला गेल्या वर्षभरापासून केवळ एकाच मंत्रिपदावर समाधान मानावे लागत आहे. मंत्रिमंडळात नगरचा दबदबा नसल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित आहेत. स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचा प्रश्न असो, की नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या सामंजस्य कराराचा, साधे निर्णय गेल्या वर्षभरात होऊ शकले नाहीत. पर्यटन हे महत्त्वाचे खाते शिंदे यांच्याकडे असूनही नगर शहराच्या पर्यटन विकासासाठी एक बैठकही झालेली नाही.

राज्यात क्षेत्रफळाने नगर जिल्हा सर्वात मोठा अाहे. मोठे क्षेत्रफळ लक्षात घेऊन किमान दोन, तरी मंत्रिपदे जिल्ह्याला मिळावीत, अशी अपेक्षा होती. शिंदे यांच्या रुपाने केवळ एक राज्यमंत्रिपद मिळाल्याने भाजपमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. किमान एक कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद जिल्ह्याला मिळावे, अशी भावना पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातीलच असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या तोडीचे कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहे. पालकमंत्री शिंदे यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना शिंदे यांनी राज्यभर दौरे केले होते. त्यामुळे शिंदे हे कॅबिनेट मंत्रिपदाच्या स्पर्धेत आले आहेत. त्यांना कृषिमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांनीही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी केली असली, तरी त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. मात्र, काही अडचणींमुळे त्यांना या विस्तारात संधी मिळता पुढच्या विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. त्यातील मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे स्नेहलता कोल्हे हे प्रथमच पक्षात आलेले प्रथमच आमदार झाले आहेत. त्यामुळे या नवीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, या नव्या आमदारांची प्रदेश अथवा महामंडळावर वर्णी लावली जाणार आहे. स्नेहलता कोल्हे यांना यापूर्वीच प्रदेशवर घेण्यात आले आहे. राजळे मुरकुटे यांची कमेटीवर अथवा महामंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

साई संस्थानसाठी चुरस
शिर्डीयेथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावर भाजपने, तर उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे. अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार राजीव राजळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावांची चर्चा आहे. अध्यक्ष जिल्ह्यातील असला, तरी सदस्य मात्र राज्यभरातील असणार आहेत, शिवसेनेने मुंबईतील सिध्दिविनायक देवस्थानचे अध्यक्षपद मागितले आहे, असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
गृहखाते नको रे बाबा...
सध्यागृहखात्याचे कॅबिनेटमंत्री स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना अन्य खात्यांचीही जबाबदारी सांभाळावी लागते. राज्यात दोन गृहराज्य मंत्रिपदे आहेत. गृह राज्य (ग्रामीण) मंत्रिपद राम शिंदे यांच्याकडे, तर रणजित पाटील यांच्याकडे गृहराज्यचा शहरी विभागाचा कार्यभार आहे. कुठलीही घटना घडल्यानंतर गृहविभागाला टीकेचे धनी व्हावे लागते. शिंदे यांचे नाव यापूर्वी गृहमंत्रिपदासाठी पुढे आले होते. मात्र, त्यांनी हे पद नको म्हणून सांगितल्याचे समजते.
शिंदेंना टाळून पाचपुते मंत्र्यांच्या भेटीला
विधानसभानिवडणुकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करून भाजपमध्ये दाखल झालेले माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनाही महामंडळाची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळात शिंदे यांची वर्णी लागणार असल्याने पाचपुते यांना किमान महामंडळ तरी मिळावे, अशी पाचपुते समर्थकांची अपेक्षा आहे. त्यासाठी पाचपुते राम शिंदे यांना टाळून मुंबईत स्वतंत्रपणे मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांच्या भेटी घेत असल्याची चर्चा आहे.