आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा विभाजनाचा आग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीत आपण जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले होते. जिल्हा विभाजनाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्यावेळी चर्चा होईल, त्यावेळी विभाजनाच्या बाजूने आपण बोलू, अशी ग्वाही पालकमंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी दिली.


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.


जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाला मागील बैठकीत आपण अनुमोदन दिले आहे. मात्र, याबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्यावेळी चर्चा होईल यावेळी आपण विभाजनाच्या बाजूने बोलू, असे पिचड म्हणाले.


पिचड म्हणाले, नगर जिल्ह्याच्या 2013-14 च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 57 कोटी 94 लाखांच्या पुनर्नियोजन प्रस्तावास बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षाच्या सर्वसाधारण योजनेसाठी 263 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, आठवडाभरात अंतिम मंजुरीसाठी तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडण्यात येईल.
नगर शहरातील बाह्यवळण रस्ता व उड्डाणपुलाच्या कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी उभे राहू दिले पाहिजे ना...


दिंडोरी मतदारसंघातून लोकसभेसाठी आपण उभे राहणार का, असे पत्रकारांनी विचारले असता ‘‘तेथील लोकांनी मला उभे राहू दिले पाहिजे ना!’’ असे सांगत लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याने पिचड यांनी सूचित केले. माढा, कल्याण, नाशिक व दिंडोरी या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. नगरचा निर्णय झाला आहे. मात्र, उमेदवारांचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.