आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Campaign Consummation Public Assembly,latest News In Divya Marathi

वैयक्तिक गाठीभेटींना वेग; मतांची व्यूहरचना, फे-या आणि जाहीर सभांनी प्रचाराची सांगता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर विधानसभा मतदारसंघात जाहीर प्रचाराची सांगता होताच सर्व उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभा घेत निवडणुकीत चुरस वाढवली. या सभा कितपत फायदेशीर ठरतात, हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल. बुधवारी (१५ ऑक्टोबर) उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.
नगर शहरात अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल राठोड, काँग्रेसचे सुवालाल गुंदेचा, अपक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, मनसेचे सचिन डफळ अशी चौरंगी लढत झाली होती. एकूण मतांच्या जवळपास पन्नास टक्के मते घेऊन राठोड निवडून आले होते. युती-आघाडी फुटल्याने यावेळी निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. भाजपचा उमेदवार पक्षाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने लढत चौरंगी होणार आहे.
शिवसेना : उमेदवार राठोड यांनी पहिल्या दिवसांपासूनच आघाडी घेतली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्‍य ठाकरे, डॉ. अमोल कोल्हे व प्रा. नितीन बानगुडे यांच्या सभा घेऊन राठोड यांनी प्रचारात मुसंडी मारली. त्यांनी पहिल्या दिवसापासून "व्होट टू व्होट' प्रचारावर भर दिला. विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. सावेडीतील भिस्तबाग चौकात कोल्हे यांची शेवटची सभा झाली. या सभेत राठोड यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सुरुवातीपासून प्रचारात आघाडीवर असलेले राठोड यावेळी विजयाचा षटकार मारणार का, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी : राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. त्यानंतर माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, पण ऐनवेळी ही सभा रद्द झाली. जगताप हे शहराचे महापौर असून त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर परिवर्तनाची साद घातली आहे. शहरात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. तरुणाईला बरोबर घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले. केलेली विकासकामे जगताप यांनी जनतेसमोर मांडली. शरद पवार यांच्या सभेचाही फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस : जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे शहरात नशीब अजमावत आहेत. सुरुवातीला झालेला स्थानिक पदाधिका-यांचा विरोध कमी करून त्यांना प्रचारात सहभागी करण्यात त्यांना यश आले. त्यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या व्यतिरिक्त पक्षाचा कोणताही दिग्गज नेता आला नाही. "बाहेरचा उमेदवार' हा शिक्का पुसण्यासाठी थोरात यांनीच पुढाकार घेतला असून यापुढे सत्यजितचे कार्यक्षेत्र नगरच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तांबे यांनी शहरातील कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न केला. विकासाचा नारा देत सोशल मीडियाचा वापरही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आला. प्रतिमा निर्मितीसाठी त्यांनी केलेला गाण्याचा वापर लक्षवेधी ठरला.
भाजप : उमेदवार अ‍ॅड. अभय आगरकर यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांच्या सभा शहरात झाल्या. आगरकर यांच्या प्रचारात प्रारंभी दिसलेला विस्कळीतपणा शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी कमी झाला. उमेदवारीवरून नाराज असलेल्या एका गटाने प्रारंभी प्रचाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात सर्वच नाराजांना एकत्र आणण्यात त्यांना यश आले. शहरातील २६३ बूथवाटपात पदाधिका-यांना विश्वासात घेण्यावरून असलेली नाराजी कमी करण्यातही त्यांना ब-यापैकी यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

शहरातील मनसैनिक बुचकळ्यात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीच्या आखाड्यातून पळ काढला. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली. ऐनवेळी पक्षाला दुसरा उमेदवार मिळाला नाही. शिवाय उमेदवार नसल्यामुळे कोणाचा प्रचार करायचा, याविषयी "राजाज्ञा'ही झाली नाही. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मनसैनिकांवर मन मारून तटस्थ राहण्याची वेळ आली.