आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Campaign Consummation Public Assembly,latest News In Divya Marathi

शेवटचा दिवस सभा आणि गर्दीचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी दिवसभर गर्दी आणि सभांची रेलचेल होती. ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढून उमेदवारांनी मतदारांना साद घातली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी संपुष्टात आली. नंतर छुपा प्रचार सुरू झाला. सर्वच पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवल्याने यंदा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची संख्या दुपटीने वाढली. वाटाघाटीत बराच वेळ गेल्याने प्रचारासाठी अवघे तेरा दिवस मिळाले. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी चांगलीच धावधाव करावी लागली. जिल्ह्यात एकूण 138 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधकांचे पानिपत करण्यासाठी उमेदवारांनी प्रचाराच्या कालावधीत शक्तिप्रदर्शन करण्याची एकही संधी सोडली नाही. स्टार प्रचारकांच्या सभेसाठी इतर गावांमधून कार्यकर्ते आयात करण्यात आले. त्यासाठी गावनेत्यांना हाताशी धरण्यात आले. काही उमेदवारांना शक्तिप्रदर्शनासाठी कार्यकर्ते मिळत नसल्याने मुकादम नेमून कार्यकर्ते भाडोत्री घ्यावे लागले. विरोधकांवर जहरी टीका करण्याची संधी कोणी सोडली नाही. अकोल्यात माजी मंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव रिंगणात आहेत. शिर्डीत माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, तर श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते हे रिंगणात आहेत.
सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आहेत.
सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी आठपासून प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. स्थानिक कार्यकर्ते प्रचारफेरी काढून मतदारांकडे मतांचे दान मागताना दिसत होते. ढोल-ताशांच्या गजरात ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली. अनेक ठिकाणी सभांचेही आयोजन करण्यात आले होते. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. जाहीर प्रचार थांबल्यानंतर रात्री छुप्या प्रचाराला सुरुवात झाली. सर्वच मतदारसंघांत रात्री घोंगडी बैठका सुरू झाल्या. प्रभागातील स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपवून मतदानाची मोर्चेबांधणी करण्यात आली. जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचा सर्वच उमेदवारांचा प्रयत्न आहे. त्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
लक्षवेधी लढती
श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे राहुल जगताप व शिवसेनेचे शशिकांत गाडे यांच्या तिरंगी लढत आहे. राहुरीत भाजपचे शिवाजी कर्डिले,
शिवसेनेच्या डॉ. उषा तनपुरे व राष्ट्रवादीचे शिवाजी गाडे यांच्यात, नेवाशात शंकरराव गडाख विरुद्ध बाळासाहेब मुरकुटे, शेवगावमध्ये राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले
विरुद्ध भाजपच्या मोनिका
राजळे, तर नगरमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल राठोड, संग्राम जगताप, अभय आगरकर, सत्यजित तांबे, अशी चौरंगी लढत आहे. पारनेरमध्ये अपक्ष माधवराव लामखडे, शिवसेनेचे विजय औटी, भाजपचे बाबासाहेब तांबे व राष्ट्रवादीचे सुजित झावरे यांच्यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
चिठ्ठ्यांचे आज वाटप
पक्षाचे चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या मतदारांना मंगळवारी (14 ऑक्टोबर) वाटल्या जाणार आहेत. त्यासाठी गावनिहाय कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे या चिठ्ठ्यांचे वाटप करणार असल्याने गोंधळ होण्याची शक्यता आहे.