आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणे पुन्हा "जैसे थे', दंडात्मक कारवाईचा मनपाने दिलेला इशारा फोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अतिक्रमण हटाव मोहिमेत एकदा काढलेली अतिक्रमणे पुन्हा त्याच ठिकाणी येत आहेत. शहरातील कापडबाजार, चितळे रस्ता, गंजबाजार आदी भागात अतिक्रमण मोहीम राबवूनही परिस्थिती "जैसे थे' झाली आहे. दरम्यान, महापालिकेने मकरसंक्रांतीला एक दिवसाची विश्रांती घेऊन शुक्रवारी पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली.
मनपा प्रशासनाने आठ दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत रस्त्यावरील टपऱ्या, हातगाड्या, तसेच पत्र्यांच्या शेडची अतिक्रमणे काढण्यात आली. माळीवाडा, हातमपुरा, गंजबाजार, टिळक रस्ता, पंचपीर चावडी आदी भागातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. परंतु अनेकांनी या भागात पुन्हा अतिक्रमणे केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर शहरातील रस्ते मोकळा श्वास घेतील, अशी आशा नागरिकांना होती. तथापि, मोहीम राबवूनही पुन्हा अतिक्रमण होत असल्याने एकाच ठिकाणी वारंवार मोहीम राबवण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे.
शुक्रवारी सकाळी कोतवाली पोलिस ठाणे, आशा चौक, पंचपीर चावडी, विशाल गणपती, शिवाजी पुतळा चौक, स्वस्तिक चौक, दिल्लीगेट या भागात मोहीम राबवण्यात आली. दुपारी साडेतीन ते सव्वासहापर्यंत सिद्धिबाग, लालटाकी, खाकीदासबाबा मठ, अप्पू हत्ती चौकापर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. मोहीम राबवत असताना किरकोळ विरोधाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. तथापि, मोहीम सुरळीतपण सुरू असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकावर गुन्हा दाखल
अतिक्रमणे काढताना किरकोळ विरोध होत असतो, पण कारवाई सुरूच आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमणे काढली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास येते. त्या ठिकाणी पुन्हा ही मोहीम राबवली जाते. ही अडचण कापडबाजार, मोचीगल्ली, माणिक चौक, बसस्थानक परिसरात निर्माण होत आहे. आतापर्यंत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'' सुरेश इथापे, अतिक्रमण हटाव विभागप्रमुख.