आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी पोलिसांनी चिखलात बसून लिहिला पेपर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोलिस भरतीमध्ये शारीरिक क्षमतेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना रविवारी लेखी परीक्षा देतानाही नाना अडचणींचा सामना करावा लागला. शनिवारी रात्री मुसळधार पावसाने या उमेदवारांना झोडपले. पावसामुळे अनेकांची ओळखपत्रे फाटली. नंतर पोलिस कवायत मैदानावर चिखलात बसून पेपर सोडवावा लागला. ‘राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर दाद कुठे मागायची?’ असे म्हणण्याची वेळ या भावी पोलिसांवर आली.

शनिवारी रात्री पावसाने नगरमध्ये दमदार हजेरी लावली. पोलिस भरती प्रक्रियेसाठी आलेले अनेक उमेदवार मागील काही दिवसांपासून पोलिस कवायत मैदानाजवळच्या सिद्धीबागेत वास्तव्यास होते. रात्री तेथेच उघड्यावर ते झोपायचे. शनिवारच्या पावसामुळे या उमेदवारांची प्रचंड त्रेधा उडाली. पावसापासून सुटका करून घेण्यासाठी काही उमेदवारांनी न्यू आर्टस् महाविद्यालयासमोर असलेल्या बसथांब्याचा, तर काही उमेदवारांनी पोलिस वसाहतीजवळ असलेल्या होमगार्ड कार्यालयाच्या वर्‍हांड्याचा आधार घेतला. अनेकजण रात्रभर जागेचे होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांना अभ्यासही करता आला नाही.

रविवारी सकाळी पोलिस कवायत मैदानासमोर लालटाकी रस्त्यावर उमेदवारांची तोबा गर्दी झाली. त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. मैदानावर प्रवेश मिळाल्यानंतर उमेदवारांची ओळख पटवणे पोलिस प्रशासनाला जिकिरीचे झाले, कारण काही उमेदवारांच्या पावसात भिजलेल्या ओळखपत्रांवर पोलिस विभागाच्या शिक्क्याशिवाय काहीच दिसत नव्हते. अखेर वरिष्ठ अधिकार्‍यांनी सूचना दिल्यानंतर काही उमेदवारांची ओळख पटवून त्यांना ओळखपत्रे देण्यात आली. लिपिक बी. बी. महाले व ए. पी. चिरमुले यांच्यावर ओळख पटवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

लेखी परीक्षेला आलेल्या काही युवतींनी पात्रता चाचणीत 50 पेक्षा जास्त गुण असूनही यादीत नाव नसल्याची तक्रार केली. सुरुवातीला प्रशासनाने जुमानले नाही, परंतु या युवतींनी आक्रमक पवित्रा घेत लेखी परीक्षेस बसू देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.सकाळी नऊ वाजता लेखी परीक्षेला सुरुवात झाली. तत्पूर्वी साडेसहा वाजता प्रशासनाने या मैदानावर बैठक व्यवस्थेचे नियोजन केले. रात्रीच्या पावसामुळे मैदानावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.


आज पाहता येणार उत्तरपत्रिका वेबसाइटवर लेखी परीक्षेसाठी एकूण 2 हजार 402 उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील 74 उमेदवार गैरहजर राहिले. परीक्षा सकाळी सात वाजता सुरू होणार होती, परंतु उमेदवारांच्या ओळखपत्रांच्या गोंधळामुळे दोन तास उशीर झाला. सोमवारी (3 जून) सकाळी लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती भरती प्रक्रिया राबवत असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
ओळखपत्राअभावी प्रवेश नाकारला जाईल, या भीतीने काही उमेदवारांनी शिक्का असलेले फोटो नव्याने चिटकवून आणले. अशा ओळखपत्रांमुळे ओळख पटवताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले. काही उमेदवारांनी लेखी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली, पण ती मान्य केली गेली नाही. मागील वर्षी लेखी परीक्षा संध्याकाळी घेण्यात आली. त्या वेळी दिव्यांची व्यवस्था नसल्याने अंधारात पेपर लिहावा लागला होता.