आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidate Poor Condition For Coming Police Recruitment

पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना जेवण व झोपण्यासाठी सिद्घिबागेचा आधार उरला आहे. भावी पोलिस बागेत मिळेल त्या ठिकाणी डासांची पर्वा न करता अस्ताव्यस्त झोपलेले असतात.

पोलिस भरती प्रक्रियेचा मंगळवारी दुसरा दिवस होता. मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेले साडेपाचशे उमेदवार व कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणीसाठी बोलावलेले पावणेसातशे उमेदवार पोलिस मुख्यालय मैदान परिसरात सोमवारी रात्रीच उपस्थित झाले. या उमेदवारांना पहाटेच मैदानात उतरावे लागणार होते. त्यामुळे इतरत्र जाण्यापेक्षा जवळच्या सिद्धिबागेत झोपण्याला उमेदवारांनी पसंती दिली. मिळेल त्या ठिकाणी हे उमेदवार झोपले. डासांचा प्रचंड त्रास असतानाही नाईलाजाने त्यांना बागेचा सहारा घ्यावा लागला. बागेत पाण्याची व्यवस्था नसल्याने या उमेदवारांचे चांगलेच हाल झाले. परिसरातील हॉटेलचालक उमेदवारांना केवळ पिण्याचे पाणी देण्यास तयार नाहीत.

कशीबशी रात्र घालवल्यानंतर पहाटे चार वाजता मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना बोलावण्यात आले. पाच किलोमीटर धावण्याच्या चाचणीसाठी उमेदवारांना अरणगाव परिसरात नेण्यात आले. तेथून परतल्यानंतर मुख्यालय मैदानावर गोळाफेक, पुलअप्स, शंभर मीटर धावणे, लांब उडी आदी चाचण्या या उमेदवारांना द्याव्या लागल्या. रात्रीची अपुरी झोप, वाढते ऊन यामुळे मैदानी चाचणीतील कामगिरीवर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली.

कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांनाही पहाटे साडेपाचलाच मैदानात उपस्थित रहावे लागत आहे. महापालिका, पोलिस प्रशासन किंवा सेवाभावी संस्थांनी सिद्धिबाग परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

आजही साडेपाचशे उमेदवार मैदानात
कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रतेसाठी मंगळवारी एक हजार उमेदवारांना बोलावण्यात आले होते. मात्र, 666 जण उपस्थित राहिले. 17 जण कागदपत्र पडताळणी व 116 जण शारीरिक मोजमापात अपात्र ठरले. उर्वरित साडेपाचशेजणांची मैदानी चाचणी सायंकाळपासून सुरू करण्यात आली. पाच किलोमीटर धावण्याची चाचणी बुधवारी पहाटे होणार असून मंगळवारच्या उर्वरित चाचण्याही बुधवारी होतील.