आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनधिकृत खाद्यविक्रेत्यांचा रेल्वेवर कब्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नगरच्या रेल्वेस्टेशनवर असलेल्या दुर्गंधीमुळे प्रतीक्षागृहात नाकाला रुमाल लावून बसलेले प्रवासी. छाया: कल्प हतवळणे. )
नगर- नगर हे दौंड-मनमाड महामार्गावरील महत्त्वाचे स्टेशन असल्याने दुरांतो सारख्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या वगळता सर्व गाड्यांना थांबा मिळाला आहे. नगर ते मनमाड दरम्यान सर्व रेल्वेंमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी विक्रेते गाड्यांत घुसतात. त्यांच्याकडील पदार्थांची कोणतीच तपासणी होत नसल्याने त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह कायम आहे. रेल्वे पोलिस थेट रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याने या अनधिकृत खाद्य विक्रेत्यांना थेट वातानुकूलित डब्यांतही थेट प्रवेश मिळत आहे.
रेल्वेचे सोलापूर विभागाचे व्यवस्थापक जॉन थॉमस शनिवारी नगर दौऱ्यावर येत आहेत. ते नगरमध्ये प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रवाशांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे ‘दिव्य मराठी’ने जूनच्या अंकात प्रसिद्ध केले. हा प्रश्न फक्त पाणी, स्वच्छतेपुरता मर्यादित नाही. रेल्वेला अनधिकृत खाद्यविक्रेत्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळत नाहीच, पण उलट त्यांच्या आरोग्यालाच धोका आहे. कारण या विक्रेत्यांची कोठेच नोंद नाही. त्यांच्या पदार्थांचा दर्जा कधीही तपासला जात नाही. अधिकृत विक्रेत्यांना मात्र सर्व नियमांची बंधने आहेत. सध्या रेल्वेत अनधिकृत विक्रत्यांकडून भेळ, चहा, वडापाव, समोसे, मणुका, इडली-चटणी आदी पदार्थांची विक्री होते. यात मिळणार नफा इतका मोठा आहे, की अनेक विक्रेते स्टेशनपर्यंत आपल्या वातानुकूलित मोटारीतून येत असल्याची माहिती एका प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्याने दिली. या विक्रेत्यांचे थेट रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संबंध असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
विक्रेत्यांची तिकिटातून सुटका
एरवी एखाद्या प्रवाशाकडे साधे तिकीट असल्यास त्याच्यावर टीसी दंड करतात. मात्र, त्यांच्यासमोरून बिनधास्तपणे वावरणाऱ्या विक्रेत्यांना साधे तिकीटही विचारले जात नाही. कारण त्यांच्याकडून रेल्वे पोलिसांना हप्ते दिले जातात. ते थेट ‘वरपर्यंत’ पोहोचतो. यातून दर महिन्याला संबंधितांना मोठी आर्थिक कमाई होत असल्याचा असा आरोप एका अधिकृत विक्रेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. कारण काहीही असो, पण या विक्रेत्यांवर कारवाई होत नाही, हे उघड सत्य आहे.
तृतीयपंथियांची खंडणीशाही
रेल्वेत प्रवाशांना तृतीयपंथियांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याकडे रेल्वेचे प्रशासन रेल्वे पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. अनेकदा प्रवाशांची या तृतीयपंथियांकडून आर्थिक लूटही होते.
प्रवाशांच्या अपेक्षा
- स्टेशन परिसर स्वच्छ दुर्गंधीविरहित असावा
- आरक्षणासाठी जादा खिडकी सुरू करावी
- स्टेशनची बाहेरची पडलेली भिंत दुरुस्त करावी
- आरक्षणासाठी टोकन पद्धत सुरू करावी
- स्टेशनवर थंड फिल्टरचे पाणी मिळावे
- नवे प्रतीक्षागृह २४ तास सुरू ठेवावे