आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डीजे अन् हत्यारे, आठ मंडळांविरुद्ध गुन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेच्या दोन गणेश मंडळांसह आणखी चार मंडळांनी बेकायदेशीर डीजे वाजवले. याप्रकरणी कोतवाली तोफखाना पोलिस ठाण्यात सहा गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. नेवासे तालुक्यातील माका येथेही बेकायदेशीर डीजे वाजवण्यात आला. इतकेच नाही, तर कार्यकर्त्यांनी चॉपरसारखी धारदार शस्त्रे हातात घेऊन हिडीस नृत्यही केले. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून चाैघांना अटक करण्यात आली. श्रीरामपूरमध्येही ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. 
 
कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समझोता तरुण मंडळाचा अध्यक्ष सागर विष्णुपंत थोरात (माळीवाडा), डॉल्बी सिस्टिमचा मालक एकनाथ अनिल डोंगरे, चालक संदीप नामदेव साळवे (वडगाव गुप्ता, नगर) ट्रॅक्टरचालक रवींद्र साहेबराव गहिले (बाभळगाव, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा, ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन, सर्वोच्च न्यायालयाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन इतर कायदा कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. डॉल्बी सिस्टिम ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला आहे. 
 
दुसऱ्या गुन्ह्याची फिर्यादही निरीक्षक परमार यांनी दिली. नवरत्न तरुण मंडळाचा अध्यक्ष सोमनाथ दत्तात्रेय गायकवाड (माळीवाडा), डॉल्बी सिस्टिमचालक मालक चंदन रामा शिंदे (वैदूवाडी, सावेडी), ट्रॅक्टरचालक मुकेश विठ्ठल थोरात (कौठीची तालीम, माळीवाडा) यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे अटी-शर्तींचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस कायदा, पर्यावरण संरक्षण ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यात वापरलेली डॉल्बी सिस्टिम वाहनेही पोलिसांनी जप्त केली. 

मानव संसाधन विभागाचे पोलिस निरीक्षक नारायण वाखारे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जालिंदर शिंदे (वैदूवाडी), काशिनाथ शिंदे (वैदूवाडी), प्रशांत लाेखंडे (खेड, पुणे), डीजेचालक अक्षय अशोक भगत (खेड, पुणे) वाहनचालक सुरेश अंबादास कदम (खेड) यांनी भिस्तबाग चौकात बेकायदेशीर विसर्जन मिरवणूक काढून डीजे वाजवले. चौकातच वाहने उभी करून लोकांना नाचायला लावले. सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होईल, असे वर्तन केले. त्याबद्दल त्यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला. 
 
तोफखान्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनीही एक फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवसेना शहरप्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते (केडगाव), सचिन सूर्यकांत जाधव (किंग्जरोड), सचिन चंद्रकांत जाधव (माळगल्ली), राजू मतकर (केडगाव) सचिन तुकाराम जाधव (नगर) यांनी बेकायदेशीररित्या विसर्जन मिरवणूक काढून दाळमंडईत डीजे लावून लोकांना नाचायला लावले. वाहने रस्त्यात धोकादायकपणे उभी करून रहदारीला अडथळा निर्माण केला. या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली डॉल्बी सिस्टिम, ट्रॅक्टर डीजे साहित्य पोलिसांनी जप्त केले. 
 
विजय धाडगे (यशोदानगर), निखिल बाबासाहेब वारे (शिलाविहार), विशाल शिंदे (गुलमोहोर रस्ता), मंगेश कानिफनाथ लकडे (भिंगार), नॅशनल जनरेटरवरील अनोळखी वाहनचालक यांनी यशोदानगर कमानीजवळ बेकायदेशीर डीजे लावला. त्यावर मोठ्या आवाजात गाणी वाजवून लाेकांना नाचायला लावून कायद्याचे उल्लंघन केले. त्यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला असून डीजेसाहित्य वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक नारायण वाखारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 
 
रस्त्यात डीजे हातात चॉपर 
माका येथे सिद्धीविनायक मंडळाने मोठ्या आवाजात डीजे वाजवून मिरवणूक काढली. यावेळी अनिकेत सुनील मुथ्था (यशवंतनगर, पाइपलाइन रस्ता), अनिल साईनाथ शेलार (वाणीनगर), प्रसाद रवींद्र पालवे, योगेश संजय थोरात, नितीन त्र्यंबक पानखडे (तनपुरेवाडी, पाथर्डी), प्रकाश पोपट नांगरे (माळीवाडा) इतर १५ ते २० जणांनी हातात चॉपर घेऊन नृत्य केले. त्यांच्याविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक निरीक्षक किरण शिंदे सहकाऱ्यांनी चौघांना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली. 
 
मिरवणूक संपताच साहित्य जप्त 
विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास पोलिसांनी कोणालाही रोखले नाही. त्यामुळे नगरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत तब्बल तीन मंडळांनी कर्णकर्कश आवाजात डीजेवर गाणी वाजवली. चिंचोळ्या गल्लीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून डीजे वाजवले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी मिरवणूक संपेपर्यंत कोणालाही अडवले नाही. मात्र, बाराचा ठोका पडताच मिरवणूक संपली अन् पोलिसांनी डीजेचे साहित्य वाहने ताब्यात घेतली. एका मंडळाने पोलिसांनी हुलकावणी देऊन पळ काढला. मात्र, नाकाबंदी करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 
बातम्या आणखी आहेत...