आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा मुजोर मंडळांचा ‘डीजे’मुक्तीला खोडा, मंडळांवर गुन्हे दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न्यायालयाचे आदेश, तसेच पोलिसांनी केलेले डीजेमुक्त मिरवणुकीचे आवाहन धुडकावून शिवसेनेच्या दोन मंडळांसह आणखी चार गणेश मंडळांनी यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पुन्हा डीजेचा दणदणाट केला. हृदयाचे ठोके वाढवणारे संगीत, कर्णकर्कश संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई अन् मद्यधुंद कार्यकर्ते, त्यामुळे रेंगाळलेली मिरवणूक, राजकीय नेत्यांचे शक्तिप्रदर्शन, घोषणाबाजी अशा वातावरणात या मंडळांनी बाप्पाला निरोप दिला. उर्वरित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक ढोलताशांच्या तालावर गणरायाचे विसर्जन केले. बुधवारी दुपारी कोतवाली पोलिसांनी समझोता नवरत्न मंडळाच्या अध्यक्ष डीजे चालकांवर गुन्हे नोंदवून त्यांची वाहने जप्त केली. तोफखान्यात गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया उशिरायर्पंत सुरू होती. 
 
मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या श्रीविशाल गणेशाची उत्थान पूजा करण्यात आली. नंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीत यंदा बारा मंडळे सहभागी झाली. विशाल गणेशाचा रथ अग्रभागी होता, तर त्याच्या पाठोपाठ इतर मानाची मंडळे होती. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. युवक युवतींचे ढोल-ताशे पथक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. हजारो गणेशभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले. बंगाल चौकी, भिंगारवाला चौक, नगर अर्बन चौक, नवीपेठ येथे नागरिकांनी विशाल गणपती रथाचे स्वागत केले. 
 
डोक्यावर फेटे, नाकात नथ आणि हातात लेझीम घेतलेल्या स्त्रिया, ढोल-ताशांचे पथक, गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. म्हणत जड अंत:करणाने नगरकरांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मानाच्या विशाल गणपतीने जागोजागी भक्तांकडून आरतीचा मान घेत आवडत्या मोदकाचा नैवेद्य स्वीकारत रथातून थाटात भक्तांचा निरोप घेतला. यंदा सगळीकडे पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीत स्थान मिळवले. सायंकाळी नंतर तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्धांनी महिलांनी, तसेच नगरकरांनी सहकुटुंब मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. 
 
मानाच्या गणपतींच्या मंडळांपुढे सहभागी नगरी ढोल, ताशा हलगी पथके हे विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. लेझीम झांज पथकेही मिरवणुकीत सहभागी झाली. काही मंडळांतील कार्यकर्त्यांनी दांडपट्टा, तलवारबाजीचे सादरीकरण केले. विसर्जन मिरवणूक दिल्ली दरवाजा वेशीत आल्यावर भाविकांनी गुलालाची उधळण गणरायाचा जयघोष केला. घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने बाळाजी बुवा बारवेजवळ हौदाची व्यवस्था केली होती. त्यामध्ये, तसेच बारवेत गणरायांचे विसर्जन करण्यात आले. 

पोलिसांचे आवाहन धुडकावून लावत शहर शिवसेना समझोता तरुण मंडळांनी यंदाही डीजे वाजवले. नवरत्न मंडळातही डीजेचा दणदणाट करण्यात आला. डीजेच्या आवाजावर अखेरपर्यंत कोणतेही निर्बंध नव्हते. चिंचोळ्या गल्लीबोळात धोकादायक इमारतींच्या परिसरातही ध्वनिमर्यादेच्या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे मिरवणूक मार्ग दणाणून निघाला. अश्लील गाण्यांवर तरुणांनी कार्यकर्त्यांनी मद्यधुंद अवस्थेत हिडीस हावभाव करत ताल धरला. पोलिस जवळ आले की, डीजेचा आवाज कमी व्हायचा. पोलिसांची पाठ फिरताच आवाज पुन्हा वाढायचा. 
 
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, एलसीबीचे पीआय दिलीप पवार, कोतवालीचे पीआय अभय परमार, ताेफखाना पीआय पांडुरंग पवार, नगर तालुक्याचे एपीआय किशोरकुमार परदेशी, भिंगार कॅम्पचे एपीआय कैलास देशमाने, एमआयडीसीचे एपीआय विनोद चव्हाण, निर्भया पथक, होमगार्ड यांच्यासह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडता मिरवणूक व्यवस्थित पार पडली. 
 
यंदाही अनेक घरांमध्ये शाडूच्या मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. काही सोसायटींमधील रहिवाशांनी मोठ्या पिंपात एकत्रितपणे सोसायटीच्या अावारात मूर्तींचे विसर्जन केले. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून निर्माल्य झाडाच्या मुळानजीक टाकण्यात आले. छोट्या-छोट्या मंडळांनी गुलाल उधळून गणरायाला निरोप दिला. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या यंदा शहरात वाढल्याचे चित्र होते. 
 
पोलिसांनी मोबाइल चोराला पकडले 
श्रीविशाल गणेशाची मिरवणूक दिल्ली दरवाजाजवळ आली, तेव्हा गर्दीचा गैरफायदा घेत एका चोराने तिघांना हात की सफाई दाखवत त्यांचे मोबाइल लांबवले, तसेच एका व्यक्तीचे पाकिटही मारले. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, शीघ्र कृती दलाचे जवान गणेश पाटील, श्याम घावटे, सुरेश मोरे, संदीप चव्हाण, सुनील माळणकर, नितीन तुमदाम, भगवान थोरात, राहुल धनेधर, रवी जाधव आदींच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याची झडती घेतली असता चोरीचे अँड्रॉइड फोन एक पाकीट सापडले. या चोराला पकडून तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तोफखाना पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. त्याची चौकशीही सुरू आहे. 

काही गणेश मंडळांपुढे डीजेच्या दणदणाटात कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते. (उजवीकडे) कापडबाजारात विसर्जन मिरवणूक मार्गावर काढण्यात आलेली भव्य रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 
 
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्व गणेश मंडळांना डीजेमुक्तीचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या तालावर नेत्रदीपक मिरवणूक निघेल या अपेक्षेने शहर, उपनगरांतील युवती महिलांनी सायंकाळी मोठ्या संख्येने मिरवणुकीला हजेरी लावली. रस्त्याच्या दुतर्फा युवती, महिला आबालवृद्ध थांबले होते. ढोल-ताशे, पारंपरिक वेषभूषा केलेल्या मंडळांची मिरवणूक सर्वांनी पाहिली. मात्र, नवीपेठेत दाखल झालेल्या मंडळांसमोर डीजेच्या तालावर मद्यधुंद तरुणांचे हिडीस नृत्य सुरू झाले. त्यावेळी मात्र युवती महिलांनी निघून जाणे पसंत केले. 
 
जलप्रदूषण रोखण्यासाठी लष्कराचे साहाय्य 
नगर-जामखेडरस्त्यावरील ऐतिहासिक हत्ती बारवेत दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असे. निर्माल्यही टाकले जायचे. त्यामुळे ही बारव कचराकुंडी बनली होती. मागील दोन-तीन वर्षे इतिहासप्रेमी मंडळे, संघटना शिक्षण संस्थांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भंगलेल्या अनेक मूर्ती बाहेर काढून ही बारव स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. यावर्षी या बारवेत मूर्ती टाकू नका, असे आवाहन ‘स्वागत अहमदनगर’ काही विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करत तेथे सैनिक तैनात केल्याने यंदा बारवेतील जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात टळले. 
 
‘ड्राय डे’चा नियम धाब्यावर 
गणेशविसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रशासनाच्या वतीने ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला होता, तरीही राजकीय नेते मंडळींनी आपल्या गणेशभक्त कार्यकर्त्यांसाठी मद्यपानाची खास व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेक भक्तांनी नशेतच गणरायाला निरोपाला दिला. किरकोळ बाचाबाचीचे प्रकारही घडले. त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला. नवरत्न मंडळाची मिरवणूक नवीपेठेत आली असता गाणे लावण्यावरुन एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याचे कपडे फाडून त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, लगेचच डीजेचा दणदणाट सुरू झाल्याने पोलिसांनी या प्रकाराकडे कानाडोळा केला. 
 
बातम्या आणखी आहेत...